‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादव सध्या तुरुंगात आहे. नोएडा पोलिसांनी नुकतेच त्याला सापाच्या तस्करी प्रकरणात अटक केल्याने तो चर्चेत आला आहे. एल्विश यादव तुरुंगात गेल्याने त्याच्या आई-वडिलांची अवस्था दयनीय झाली आहे. पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक करुन तुरुंगात टाकले आहे. दरम्यान, त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाबाबत अनेक खुलासे करत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. एल्विश यादव तुरुंगात गेल्याने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. (Elvish Yadav Father Statement)
एल्विश यादवच्या पालकांनी नुकतीच एका मीडिया वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी दोघांनीही आपल्या मुलाला निर्दोष घोषित केले. या मुलाखतीत एल्विश यादवच्या वडिलांनी काही मोठे खुलासे केले आहेत, जे ऐकल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. एल्विश अनेकदा आलिशान गाड्यांसह सोशल मीडियावर दिसला. कधी लॅम्बोर्गिनी, कधी बीएमडब्ल्यू. याशिवाय मालमत्तांबाबतही अनेक मोठे दावे चाहत्यांसमोर करण्यात आले.
एल्विशने त्याच्या एका व्लॉगमध्ये सांगितले होते की, त्याच्याकडे दुबईमध्ये ८ कोटी रुपयांचा चार बीएचके फ्लॅट आहे. एल्विशच्या या वक्तव्याला खोडून काडत आता त्याच्या वडिलांनी सांगितले की, “त्यांच्या मुलाकडे ना महागडी कार आहे, ना आलिशान घर. एल्विशने इंस्टाग्रामवर जी लाईफ दाखवली आहे ती सर्व बनावट आहे”, हे जाणून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एल्विश यादवच्या वडिलांनी सांगितले की, “त्यांच्याकडे फॉर्च्युनर आहे, ती देखील त्यांनी हप्त्यांवर घेतली आहे. व्हिडीओमध्ये दाखवण्यासाठी, एल्विश मित्रांच्या गाड्या उधार घेतो किंवा नवीन कार भाड्याने घेतो, ज्या तो काम संपल्यानंतर परत करतो. फॉलोअर्स विचार करत आहेत की, या सर्व त्याच्या गाड्या आहेत, त्याच्याकडे ५० कोटींचे घर आहे. माझं घर मी कर्जावर घेतलं आहे. मी जमिनीच्या बदल्यात प्लॉट घेतला आहे, त्यावर मी घर बांधत आहे”.
एल्विश यादवच्या वडिलांनी पुढे सांगितले की, “गुडगाव व दिल्लीसारख्या ठिकाणी घर विकत घेणे हा काही विनोद नाही. एल्विश फक्त गमतीने म्हणतो की हे त्याचे घर आहे, अनेक गोष्टी दिखाव्यासाठी आहेत. त्याचा एक भाड्याचा फ्लॅट असून त्यात तो व्हिडीओ बनवतो. तो काही महिन्यांसाठी भाड्याने सेकंड हँड वाहने घेतो. लोकांना नवीन गोष्टी पाहायला आवडतात असे त्याला वाटतं”.