Hina Khan New Show : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिनेत्रीवर सध्या उपचार सुरु आहेत आणि दरम्यान ती बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्रीने तिचा नवीन शो जाहीर केला असून तिचा हा शो जानेवारीमध्येच पडद्यावर येण्यासाठी सज्ज असल्याचंही समोर आलं आहे. हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा नवीन थ्रिलर शो ‘गृहलक्ष्मी’चा टीझर शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या टीझरमध्ये गुलाबी साडी नेसलेली, मोकळे केस आणि तीक्ष्ण वृत्ती असलेल्या हिना खानचा यापूर्वी कधीही न पाहिलेला अवतार समोर आला आहे.
टिझरसह कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने शोची स्टोरी आणि प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे. टीझर शेअर करताना, हिना खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “‘गृहलक्ष्मी’च्या अप्रतिम कलाकारांना भेटा, बेतालगडच्या हृदयातील प्रेम, विश्वासघात आणि जगण्याची एक मनोरंजक कथा आहे कारण ही कथा धोका आणि अडचणींनी भरलेल्या जगात प्रवेश करते. ती तिचे कुटुंब, तिचे साम्राज्य आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लढते. हे मनोरंजक नाटक चुकवू नका! १६ जानेवारी रोजी फक्त EPIC ON वर प्रवाहित केले जाईल”.
‘गृहलक्ष्मी’मध्ये हिना खान लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोमध्ये चंकी पांडे, राहुल देव आणि दिव्येंदू भट्टाचार्य देखील दिसणार आहेत. चंकी पांडे काझीच्या भूमिकेत, राहुल देव पोलिसाच्या भूमिकेत आणि दिव्येंदू विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी हिना खानने ‘हॅक व डॅमेज’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.
मात्र अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली ती स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधून. या शोमधून ती अक्षरा या नावाने घराघरात ओळखली जाऊ लागली. याशिवाय ती ‘बिग बॉस ११’ ची फर्स्ट रनर अप होती. सध्या हिना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करत आहे. या आजाराशी लढा देत ती बरी होताना दिसत आहे. इतकंच नाही तर केमोथेरपीनंतर अभिनेत्री कामावर परततानाही दिसत आहे.