वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी संपूर्ण राज्यभरातच संतापाची लाट आहे. या प्रकरणानंतर राजकारणात सक्रिय असणाऱ्या या कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या या प्रकरणाबाबत पोलिस कसून चौकशी करत आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राज्यभरातील हुंडाबळीची विविध प्रकरणं समोर येत आहेत. वैष्णवीनंतर एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. लग्नाला जवळपास एक ते दोन महिने झाल्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचललं होतं. यामागे हुंडा हे एकमेव कारण होतं. आता आणखी एक घटना समोर आली आहे. चित्रा वाघ यांनी एका धक्कादायक घटना सगळ्यांमसोर आणली आहे. (dowry marriage death)
सुमन म्युझिक मराठी या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चित्र वाघ यांनी हुंडाबळीची एक घटना सांगितली. ही घटना अक्षरशः अंगावर काटा आणणारी होती. हुंड्यापोटी सासू व नवऱ्याने गरोदर महिलेला खांबाला बांधून जिवंत जाळलं. ही घटना क्रुरता आणि माणूसकीचं राक्षसी रुप दर्शवणारी होती. चित्रा वाघ स्वतः त्या घटनास्थळी गेल्या होत्या. दरम्यान त्यांनाही संपूर्ण प्रकार ऐकून व बघून मोठा धक्का बसला.
चित्रा वाघ म्हणाल्या, “अंबरनाथ ग्रामीणची एक केस होती. सात महिन्याची एक गरोदर महिला होती. तिला खांबाला बांधून जिवंत जाळली होती. मी तिथे गेले होते. मला इतकं जीवाला थरकाप उडवणारा तो प्रसंग होता. तिच्या पोटातल्या बाळालाही त्यांनी मारुन टाकलं. आणि त्या बाईलाही त्यांनी मारुन टाकलं”.
“खांबाला बांधून तिला संपूर्ण जाळलं. पोळी किंवा भाकरी करताना जरासं आपलं बोट भाजलं की, आपण ते पाण्याखाली धरतो. त्याला कॉलगेट लाव, त्याला बर्फ लाव, काय काय उपाय करतो. तिच्या जीवाचा काय थरकाप झाला असेल. आणि हे सगळं कशासाठी तर हुंडा, पैसे, दागिने. हे असे लांडगे खूप आहेत. समाजामध्ये ही विकृती आहे. कुठेतरी ही ठेचून काढली पाहिजे. पुन्हा मी तेच म्हणते की, याच्यासाठी कायदे आहे. पण सामाजिक प्रबोधन तितकंच गरजेचं आहे. आता तिला मारणारं कोण होतं? फक्त पुरुष होते का? तर तसं नव्हतं. तिची सासू पण होती. ती पण एक बाईच आहे ना… एक बाई दुसऱ्या बाईचं दुःख समजू शकत नाही हे आणखीनच वाईट आहे”. हुंडाबळीला आळा बसावा यासाठी कठोर पावलं उचलणं आता खरंच गरजेचं आहे.