Divya Pugaonkar Wedding : मराठी कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस’ फेम अंकिता वालावलकरची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळतेय. कोकणात अंकिता व कुणाल सात फेरे घेणार असल्याचं समोर आलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच अभिषेक गांवकर, रेश्मा शिंदे ही कलाकार मंडळीही लग्नबंधनात अडकली. यापाठोपाठ आता मालिकाविश्वातील प्रेक्षकांची लाडकी नायिका अभिनेत्री दिव्या पुगांवकरही लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. बरेच दिवसांपासून दिव्या लग्न करणार असल्याचं कानावर येत होतं. यानंतर आता अभिनेत्रीची लगीनघाई सुरु झाली असल्याचं समोर आलं आहे. थेट फोटो शेअर करत तिने लगीनघाईला सुरुवात झाली असल्याचं म्हटलं आहे.
आजवर दिव्याने अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘मुलगी झाली हो’ या मालिकांमुळे दिव्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर आता दिव्याने लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं फोटो शेअर करत सांगितलं आहे. दिव्याने तिच्या मेहंदी सोहळ्याचे खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये नवऱ्या मुलीच्या वेशात दिव्या खूपच सुंदर दिसत आहे. मेहंदी लूकसाठी दिव्याने खास गुलाबी रंगाचा वेस्टर्न टच असलेला पारंपरिक असा लेहेंगा परिधान केला आहे. आणि त्यावर डायमंड ज्वेलरी घालत तिने हा लूक पूर्ण केला आहे.
आणखी वाचा – रणवीर अलाहबादियाच नव्हे तर हार्दिक पांड्यानेही केलेलं अश्लील वक्तव्य, ‘ते’ ऐकताच देशभरात झालेला संताप

दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षर घरत आहे. अक्षर एक फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. दिव्या व अक्षयची मैत्री फेसबुकवर झाली होती. त्यानंतर काही काळाने दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अक्षर व दिव्याच्या नात्याला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. सध्या दिव्या ‘लक्ष्मी निवास’ या काम करत आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
दिव्या व अक्षर या दोघांचा तिलक समारंभ १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. यानंतर अनेकदा अभिनेत्रीकडे ती लग्नबंधनात केव्हा अडकणार याबद्दल विचारणा केली जायची. यावर दिव्याने, “लवकरच लग्नाबद्दल खुलासा करेन” असं सांगितलं होतं. आता अखेर दिव्याला अक्षरच्या नावाची मेहंदी लागली आहे. आता त्यांचं लग्न नेमकं कधी आहे याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे.