बॉलिवूडमधील विनोदाचा बादशाह जॉनी लिव्हर ८०च्या दशकापासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. सध्या जॉनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. जॉनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कलाकारांबरोबर काम करतानाचे अनुभव सांगितले आहेत. यावेळी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ कलाकार धर्मेंद्र यांच्याबद्दलचा धमाकेदार किस्सा सांगितला. (johnny lever on Dharmendra)
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत जॉनी अगदी भरभरुन बोलत होते. धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. अशामध्ये मुलाखतीदरम्यान जॉनी यांनी धर्मेंद्रजींबद्दल एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “धर्मेंद्र हे ‘रिअल मॅन’ आहेत. धर्मेंद्रजी हे खूप धाडसी आहेत. ते जसे आतून आहेत तसेच ते बाहेरुनदेखील आहेत. ते खूपच चांगले असून त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात.” हे सांगितल्यानंतर धर्मेंद्रजींबाबतचा लिफ्टमधील एक प्रसंग त्यांनी सांगितला.
लिफ्टमधील प्रसंग सांगताना ते म्हणाले की, “धर्मेंद्रजी एकदा लिफ्टमधून जात असताना एक व्यक्ती त्यांच्याबरोबर होती. धर्मेंद्रजींना पाहून त्या व्यक्तीचा विश्वासच बसेना. तो व्यक्ती धर्मेंद्रजींना म्हणाला की, तुम्ही खरंच धर्मेंद्र आहात का? माझ्या डोळ्यांना विश्वासच बसत नाही. असे ऐकल्यानंतर धर्मेंद्रजींनी काहीही न बोलता त्याच्या कानशिलात लगावली आणि विचारलं, ‘आता बसला का विश्वास ?’ आणि ते लिफ्टमधून बाहेर पडले”. हा किस्सा सांगत जॉनी म्हणाले की, “धर्मेंद्रजी कोणालाही घाबरत नव्हते. धर्मेंद्र व विनोद खन्ना हे दोघेही धाडसी आहेत. त्यांच्या बिनधास्त वागण्यामुळे अनेकदा कोर्टाच्या वाऱ्यादेखील त्यांना कराव्या लागल्या”. जॉनी हे धर्मेंद्र यांचे मोठे चाहते असून त्यांचा ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट १५ वेळा पाहिला असल्याचे सांगितले.
या मुलाखतीमध्ये जॉनी यांनी गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभवदेखील सांगितला आहे. गोविंदाबरोबर जॉनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदासह काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. पण आता गोविंदा देखील आपल्या कामामध्ये खूप व्यग्र असल्याने भेट कमी होते असे त्यांनी सांगितले.