धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्याप्रमाणे ‘धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ उलगडण्यास लवकरच सज्ज होणार आहे. प्रसाद ओक याने या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आनंद दिघे यांच्या जीवनातील उलगडलेल्या घटना आता या भागात पाहायला मिळणार आहेत. (Prasad Oak On Anand Dighe)
अभिनेता प्रसाद ओक याच्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नवरात्रोत्सव व आनंद दिघे यांचं एक वेगळंच नातं होतं. दरवर्षी टेंभीनाका ठाणे येथील नवरात्रोत्सवात ते दर अष्टमीला आरती करायचे. हा क्षण यंदाच्या नवरात्रीचे औचित्य साधत काल प्रसाद ओक आणि इतर कलाकारांच्या उपस्थितीत चित्रित झाला. आनंद दिघे यांच्या वेशभूषेत प्रसादला पाहून भाविकांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी प्रसादला आनंद दिघे समजून पाया पडत त्यांचा आशीर्वाद घेतला. रविवारी नवरात्रौत्सवाच्या अष्टमीनिमित्ताने आयोजित सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांच्या वेशात गर्दीतून एन्ट्री मारून आलेल्या भक्तांना आश्चर्याचा धक्काच दिला.
याबाबतची एक पोस्ट प्रसादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. या खास क्षणाचा व्हिडीओ शेअर करत प्रसादने कॅप्शन देत लिहिलं आहे की, “मा. गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या रुपात आईचं इतक्या जवळून दर्शन मिळणं हे मी माझं परमभाग्य समजतो…!!! काल देवीचे आशीर्वाद घेऊन #धर्मवीर २ चा मुहूर्त शॉट घेतला…!!! चित्रीकरण लवकरच सुरु होईल…!!! पहिल्या भागा इतकंच प्रेम आपण दुसऱ्या भागावरही कराल अशी आशा करतो…!!!”.
‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या लेखन व दिग्दर्शनाची धुरा प्रवीण विठ्ठल तरडे यांनी साकारली आहे. तर चित्रपटाची निर्मिती निर्माते मंगेश देसाई यांची आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटातील पहिल्या भागातील कलाकारांच्या अभिनयाने, चित्रपटातील गाण्यांनी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. आता चित्रपटाच्या आगामी भागात धर्मवीर आनंद दिघे यांचं हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि त्यासाठी त्यांची धडपड दाखवण्यात येणार आहे.