बिग बजेट अशा ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर अनावरण सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. दिग्गज मंडळी व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांनी हजेरी लावली. अगदी दिमाखात हा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झालेला पाहायला मिळाला. तर सलमान खान, गोविंदा, जितेंद्र, अंकिता लोखंडे व विकी जैन यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शान वाढविली. (Devendra Fadnavis at Dharmaveer 2 trailer launch)
दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागून राहिली. सदर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाष्य लक्षवेधी राहील. धर्मवीर २ चित्रपटाची स्तुती करत त्यांनी आनंद दिघे व डॉ. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरही चित्रपट यायला हवा अशी इच्छा व्यक्त केली. “मलादेखील एक सिनेमा काढायचा आहे. मी जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळ आली की, निश्चितच मी सिनेमा काढणार”, असं म्हणत त्यांनी इच्छा व्यक्त केली.
🕖 7.10pm | 20-7-2024📍Worli, Mumbai | संध्या. ७.१० वा. | २०-७-२०२४📍वरळी, मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2024
LIVE | धर्मवीर 2, मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च@mieknathshinde @ZeeStudios_#Maharashtra #Dharmaveer2 https://t.co/9Qd4q0e0TS
यापुढे धर्मवीर चित्रपटाबाबत बोलताना ते म्हणाले, “धर्मवीर सिनेमा ज्यांनी पाहिला, त्यांना या सिनेमाने चेतवले. सिनेमा ज्यावेळी प्रदर्शित झाला, तेव्हा याचे भाग दोन येतील याबद्दल कोणाला माहीत नव्हते. चित्रपटाबरोबरच शिंदे यांच्या जीवनाचा भाग दोन येईल, याचीही कोणाला कल्पना नव्हती. पण तोही भाग दोन लवकरच सुरु झाला. दिघे यांच्या शिकवणुकीप्रमाणे शिंदे यांनी ज्याप्रकारे आज महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. ते पाहता आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती”.
पुढे ते म्हणाले, “विचारांशी गद्दारी झाली म्हणून एकनाथ शिंदे सरकार सोडून बाहेर आले. पण दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवले गेले. पण ज्यावेळी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीशी असते, तेव्हा कितीही हिणवले गेले, तरीदेखील खरे सोने काय आहे, हे महाराष्ट्राची जनता हेरते आणि म्हणून शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले. धर्मवीर ही सत्यकथा आहे. एक व्यक्ती सामान्यातून असामान्य कसा होतो आणि अनेक लोकांना असामान्य कसा बनवतो, हे दिघे साहेबांच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळते. यासाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. तरडे यांनी आतापासूनच ‘धर्मवीर ३’ आणि ‘४’ ची तयारी सुरु करावी. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे, तो पुढचे १५-२० वर्ष तरी थांबणार नाही. हा मला विश्वास आहे”.