Ajit Pawar funeral details : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं. काल दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी त्यांचे निधन झाले. विमान लँड होत असताना झालेल्या या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे. आज विद्या प्रतिष्ठान मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी कार्यकर्त्यांसह, राजकारणी आणि कुटुंबीयांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. दादांना अखेरचा निरोप द्यायला जनसमुदाय लोटला आहे. आणि या सगळ्यांच्या उपस्थिती अखेर अजित पवार अनंतात विलीन झाले.
जनसमुदायाच्या आक्रोश, त्यांच्या डोळ्यांतील पाणी हे त्यांच्या स्वभावाचे प्रतीक आहे. अजित पवार हे काल सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे सभेसाठी बारामतीला येण्यासाठी निघाले होते. मात्र बारामतीत पोहोचल्यानंतर विमान लँड होत असताना ते कोसळले. या अपघातात अजित पवारांसह इतर पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या बातमीने पत्नी सुनेत्रा पवार, आणि मुलं पार्थ आणि जय पवार यांनाही अश्रू अनावर झाले. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी जनसमुदायातून रडण्याचा आवाज आणि नारे ऐकू आले.





