दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी आहे. या जोडीचा फॅन फॉलोविंगही खूप मोठा आहे. नुकतीच या जोडीने करण जोहरचा टॉक शो ‘कॉफी विथ करण सीझन ८’ मध्ये हाजरी लावली होती. काही दिवसांपासून त्यांच्या या शोमधील एंट्रीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. अशातच त्यांच्या लग्नादरम्यानच्या आणखी एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्यांदाच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात दीपिका, रणवीरच्या लग्नसोहळ्यातले खास क्षण पाहायला मिळाले. (Deepika Ranveer Wedding Video)
या जोडप्याच्या लग्नाच्या व्हिडिओपासून ते कार्यक्रमादरम्यान रणवीर आणि दीपिकाने केलेलं एकमेकांचे कौतुक अशा प्रत्येक क्षणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा स्वप्नवत असा लग्नाचा व्हिडिओ ‘कॉफी विथ करण ८’च्या पहिल्या भागात पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आला.
‘कॉफी विथ करण ८’या कार्यक्रमात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रत्येक सोहळ्याची झलक दाखवण्यात आलेली पाहायला मिळतेय. दीपिकाशी लग्न करण्याच्या दिवशी रणवीर असं बोलताना दिसतोय की, ‘मी म्हणालो होतो की एक दिवस मी दीपिका पदुकोणशी लग्न करेन, आणि बघा, आज तो दिवस आहे.’ असं म्हटल्यानंतर दोघांच्या लग्नाच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरूवात होते.
दीपिका रणवीरच्या लग्नातील खास क्षण पहिल्यांदा समोर येताच त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओच्या अनेक क्लिप पोस्ट करण्यास चाहत्यांनी सुरुवात केली आहे. दीपिका व रणवीरचा एक व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करत त्यांच्या एका चाहत्याने ट्विट करत म्हटलं आहे की, ‘रात्रीचे १२ वाजले आहेत आणि मी रडत नाही आहे मित्रांनो. रणवीर सिंगने दीपिका पदुकोणची अक्षरशः पूजा केली. दीपिकावर त्याचं प्रेम इतकं आहे की तो एक वेडेपणा म्हणावा लागेल.’


त्यांच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट आल्या आहेत, एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, ‘भाई रणवीर ज्या पद्धतीने दीपिकाकडे पाहतो, ज्या पद्धतीने तिचा आदर करतो त्या पद्धतीने त्याने सार्यांना हे दाखवून दिलं की, त्याने तिला आयुष्यभरासाठी जिंकले आहे.’ तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, ‘ते खरे तर बाजीराव-मस्तानी आहेत.’