कलाकार कोणतीही अपेक्षा न करता अगदी मनापासून रसिकप्रेक्षकांचं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मनोरंजन करत असतात. प्रेक्षकही आपल्या आवडत्या कलाकाराला अगदी डोक्यावर उचलून धरतात. कलाकार-प्रेक्षकांमधलं हे प्रेम अगदी अतूट आहे. चाहत्यांच्या प्रेमाची प्रचिती कलाकारांन अनेकदा येते. असाच अनुभव सुप्रसिद्ध मराठी अभिनेते राजेंद्र शिसतकर यांनाही आला आहे. राजेंद्र यांनी मराठी चित्रपट, हिंदी वेबसीरिज, मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. ‘क्राइम पेट्रोल’मधील त्यांची भूमिका तर टर्निंग पॉइंट ठरली. राजेंद्र यांच्या पोलिसांच्या भूमिका तर प्रचंड गाजल्या. त्यांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये फिरायला गेले असता ते कुटुंबासह पूरामध्ये अडकले. त्या घटनेमध्ये वेळोवळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना मदत केली. याचबाबत राजेंद्र यांनी भाष्य केलं आहे.
राजेंद्र यांनी ITSMAJJA च्या ‘हॅशटॅग ठाकूर विचारणार’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काश्मीरमध्ये पुरात अडक्यालनंतर काय परिस्थिती उद्भवली?, तिथून बाहेर कसे पडले? याबाबत सांगितलं. ते म्हणाले, “सलग तीन-चार वर्ष मी शूटच करत होतो. त्यामुळे बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया असं आमचं ठरलं. मी, पत्नी व मुलगी काश्मीरला फिरायला गेलो. मे महिना होता. दल सरोवर येथे आम्ही राहिलो होतो. ज्या दिवशी आम्ही परत यायला निघणार होतो तेव्हाच सकाळी सात वाजता बोंबाबोंब सुरु झाली. दुपारी दोनचं आमचं त्यादिवशीचं फ्लाइट होतं. बाहेर सगळे बोट तोडफोड करत होतो. ज्यांनी आमची टूर मॅनेज केली होती तो माझ्याजवळ आला. तुमच्या बॅग्स रेडी आहेत का? असं त्याने मला विचारलं. मी हो म्हटल्यानंतर तो आताच चला असं म्हणाला. तिथून बाहेर पडायला तीन ते चार रस्ते होते. पण तिथे सगळीकडे पाणी भरलं होतं. आम्ही पुढे जाऊच शकलो नाही. तिथेच सगळे अडकलो”.
आणखी वाचा – इंडस्ट्रीमध्ये घाण, काम करणाऱ्यांचे हाल अन्…; गणेश आचार्यांकडून धक्कादायक माहिती, सांगितलं काळं सत्य
“त्यानंतर आम्हाला कळालं की, झेलम नदीमुळे सगळीकडे पूर आला आहे. पुढे करायचं काय? हा प्रश्नच होता. बोटीही बुडाल्या होत्या. आमच्याबरोबर असलेला व्यक्ती म्हणाला की, तुम्ही माझ्या घरी चला. दल सरोवरच्या इथेच त्याचं घर होतं. तिथे आम्ही गेलो. त्याने आम्हाला राहायला रुम दिली होती. दोन-तीन दिवस उलटून गेले तरी पाणी कमीच होत नव्हतं. तिथे सैन्यदलातील सैनिकही होते. चौथ्यादिवशी त्यातीलच एक सैनिक आला. त्याने मला म्हटलं साहेब मी नांदेडचा आहे. त्याला मी परिस्थिती विचारली तर तो म्हणाला खूप खराब सुरु आहे. त्यानेच आम्हाला सांगितलं की, तुम्ही अकरा वाजता अमुक—मुक जागी थांबा तिथून सैन्याचा ट्रक येईल. तो राज्यपालांच्या घरी घेऊन जाईल. तिथून हेलिकॉप्टरने लोकांना रेस्क्यु करत आहेत. मीही माझ्या कुटुंबाला त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने त्या जागी घेऊन गेलो. गेल्यानंतर मला लक्षात आलं की, साधारणपणे चार लाख लोक आधीच तिथे अडकले आहेत. तेही जंगलात. तिथे मी जेव्हा होतो तेव्हा बऱ्याच लोकांनी ‘क्राइम पेट्रोल’मुळे मला ओळखलं”.
पुढे ते म्हणाले, “एका सकाळी तिथे फिरायला आलेली बिहारची मुलं माझ्याकडे आली. त्यांनी मला तुमची मुलगी कुठे आहे म्हणून विचारलं. मी मेन गेटला आहे म्हणून सांगतिलं. त्यांनी तिच्यासाठी कुठूनतरी शोधून फळं आणली होती. मी तिथल्या लोकांकडे माझ्या मुलीसाठी बिस्कीट मागितलं. तीन दिवस मी तिला तेच देत होतो. बायको व मी काहीच खाल्लं नाही. तिथे झऱ्याचं पाणी होतं. एक बाटली भरण्यासाठीही अर्धातास लागत होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘क्राइम पेट्रोल’मुळे मला लोकांनी ओळखलं व मदत केली. चार लाखांवर माझा परतण्यासाठी नंबर होता. तो चक्क पाच हजारावर आला होता. अखेर गेटपर्यंत पोहोचलो. गेटवरच्या माणासानेही मला ओळखलं होतं”.
आणखी वाचा – बाईच बाईला जिवंतपणे मारते हे ‘तू’ सिद्ध केलंस…
“दुपारी सगळे निवांत झोपलेले असताना त्या गेटवरच्या माणसाने मला बोलावलं. तो म्हणाला, मी गेट उघडणार तुम्ही पटकन आतमध्ये शिरा. आम्ही तसंच केलं. तिथे बायको-मुलीला बसायची सोय झाली. तो वार होता बुधवार. माझी मुलगी म्हणाली डॅडी बस्स झालं आता घरी चला. मी म्हटलं उद्या गुरुवार आहे स्वामी आपल्याला वाचवणार. आणि तसंच घडलं. सैन्यदलाने दिल्लीमध्ये सुखरुप आम्हाला विमानाने पोहोचवलं. पहिला फोन आईला केला. तिच्याशी बोलून पहिल्यांदा मी खूप रडलो. आणि माझ्यामागे लोकांची गर्दी जमली होती. सगळ्यांनी माझी समजूत काढली. ‘क्राइम पेट्रोल’मुळे माझं कुटुंब वाचलं”. राजेंद्र यांचा कुटुंबासह हा पुर्नजन्मच होता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.