टेलिव्हिजन क्षेत्रातील आवडता कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ने खूप लोकप्रियता मिळवली. या कार्यक्रमाने संपूर्ण देशाला खळखळून हसवले. तब्बल आठ वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण नंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमामधून कपिल शर्मा, किकू शारदा, सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक,अर्चना पूरण सिंह यांना खूप प्रसिद्धी मिळाली. जेव्हा हा कार्यक्रम बंद झाला तेव्हा मात्र प्रेक्षक खूप नाराज झाले होते. पुन्हा एकदा हा शो सुरु करावा अशी प्रेक्षकांची खूप इच्छा होती. ही प्रेक्षकांची इच्छा लवकरच पूर्ण झाली. (kapil sharma new show off air)
कपिल पुन्हा एकदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला होता. हा नवीन शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा शो तब्बल १९२ देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचीही खूप पसंती मिळाली होती. पण आता दोन महिन्यानंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
हा कार्यक्रम बंद होण्याबद्दलची पोस्ट अर्चनाने आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन शेअर केली आहे. यामध्ये तिने काही फोटो शेअर केले असून त्यातील एका फोटोमध्ये केक कापताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत ‘सीजन संपले’ असेही लिहिले आहे. तसेच ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीमध्येही अर्चनाने सांगितले की, “या कार्यक्रमाचे पहिले सीझन संपले असून त्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. नुकतेच आम्ही शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे”.
तसेच ती पुढे म्हणाली की, “सेटवर आम्ही खूप धमाल करायचो. त्यामुळे आतापर्यंतचा प्रवास खूप छान होता. आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून खूप चांगला वेळ एकत्रितपणे घालवला आहे”. दरम्यान हा नवीन शो लवकर निरोप घेत असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल किकूने देखील या शो बद्दल सांगताना म्हणाला की, “आम्ही १३ भाग पूर्ण केले आहेत. सध्या फक्त पहिल्या सीझनचे चित्रीकरन संपवले आहे. दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल”, असेही त्याने ‘न्यूज १८’ वाहिनीबरोबर बोलताना सांगितले आहे.
या शोमध्ये रणबीर कपूर,नितू कपूर, विकी कौशल, सनी कौशल, आमिर खान, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर,दिलजित दोसांज, परिणीती चोप्रा, इम्तियाज अली हे कलाकार सहभागी झाले होते.