Pinga G Pori Pinga : प्रत्येकासाठी मैत्रीची व्याख्या ही निराळी असते. मैत्री हे नातं प्रत्येकाच्या आयुष्यात असणे आवश्यक आहे. अनेकजण आपापली ही मैत्री वेगवेगळ्या पद्धतीने निभावताना दिसतोय. मैत्रीच्या या दुनियेत प्रत्येकजण आपल्यावर आलेलं संकट विसरुन मन मुराद मैत्रीचा आनंद लुटताना दिसत आहे. बरेचदा हिच मैत्री या संकटावेळी उपयोगी पडताना दिसते. मालिका विश्वात मैत्रीवर आधारित अनेक मालिका या प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या पाहायला मिळाल्या. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेले दिसलं. या पाठोपाठ मैत्रीची अनोखी व्याख्या सांगणारी आणखी एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समोर आलंय.
‘पिंगा ग पोरी पिंगा’ असे या मालिकेचे नाव असून पाच अभिनेत्रींची या मालिकेतून खरीखुरी मैत्री पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेच्या या प्रोमोमध्ये पाच मैत्रिणींची एकमेकांप्रती असलेलं प्रेम, काळजी, निष्ठा, आदर, पाहायला मिळतोय. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या भन्नाट मालिकेच्या माध्यमातून ‘कलर्स मराठी’ने प्रेक्षकांना नवं सरप्राईज दिलं आहे. एक युनिक स्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
एका बड्या सोसायटीत पेईंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या पाच मुलींभोवती फिरणारं या मालिकेचं कथानक आहे. या पाचजणी काय धमाल करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘रमा राघव’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये पुन्हा एकदा या मालिकेच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवायला सज्ज आहे. ऐश्वर्यासह विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
आणखी वाचा – “बारामतीची सून”, वैभव चव्हाणसह इरिनाचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “फॉरेनची पाटलीण…”
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाच मैत्रिणींपैकी एकीची म्हणजेच प्राजक्ताची एक मुलगा आणि त्याचे काही मित्र छेड काढतात. यावर प्राजक्ताच्या इतर चारही मैत्रिणी एकत्र येत त्या मुलाला धडा शिकवताना दिसत आहेत. हा प्रोमो पाहून मालिका केव्हा सुरु येतेय याची उत्सुकता वाढून राहिली आहे. इतकंच नव्हे तर येत्या २५ नोव्हेंबरपासून ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम द्यायला सज्ज होत आहे.