CID Actor Dinesh Phadnis Dies at 57 : ‘सीआयडी’ या लोकप्रिय टीव्ही शोने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला होता. तब्बल वीस वर्ष सुरु असलेला हा शो अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. या शोच्या प्रेक्षकांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. फ्रेडरिक्स म्हणजेच फ्रेडीची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून दिनेश यांची प्रकृती ठीक नव्हती. अनेक अवयव निकामी झाल्याने दिनेश फडणीस यांना वाचवता आले नाही.
दिनेश फडणीस यांच्या निधनाने संपूर्ण ‘सीआयडी’ टीमला धक्का बसला आहे. तसेच सिनेसृष्टीतही शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगी असा परिवार आहे. अभिनेत्याच्या निधनाने त्यांच्या कुटुंबालाही खूप मोठा धक्का बसला आहे. दिनेश फडणीस यांच्या पत्नीला याचा मोठा धक्का बसला आहे. २० नोव्हेंबर रोजी दिनेश फडणीस यांच्या लग्नाचा वाढदिवस होता.
अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वीच दिनेश फडणीस यांचे लग्न झाले होते. त्यानंतर ‘सीआयडी’ या लोकप्रिय शोमधील फ्रेडीची भूमिका मिळाल्याने त्यांचे कुटुंब खूप आनंदी होते. दिनेश फडणीस यांच्या पत्नीचे नाव नयना फडणीस आहे. २० नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाचा वाढदिवस साजरा करून अवघ्या १५ दिवसांतच दिनेश फडणीस आपल्या कुटुंबाला सोडून जातील असं कोणाच्याही मनातही आलं नसावं. २०१८ साली २५ वर्ष पूर्ण होताच त्यांनी सोशल मीडियावरून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर यंदा त्यांच्या लग्नाला तब्बल ३० वर्ष पूर्ण झाली आहेत.
दिनेश फडणीस यांना एक मुलगी असून तिचे नाव तनू आहे. वडिलांच्या निधनाने त्यांच्या लेकीलाही खूप मोठा धक्का बसला आहे. दिनेश फडणीस यांच्या मुलीचे लग्न झाले असून तिला एक मुलगीही आहे. दिनेश नेहमीच त्यांची नात ध्रुवी बरोबरचे अनेक फोटो शेअर करत असायचे. विशेष म्हणजे त्यांचा व त्यांच्या नातीचा वाढदिवस हा २ नोव्हेंबरला एकाच दिवशी येतो.