एकीकडे बॉलीवूड व अन्य भाषिक सिनेमे बॉक्सऑफिसवर बंपर हिट होत असताना आज हॉलिवूडच्या दोन मोठ्या दिग्दर्शकांचे दोन तगडे सिनेमे मोठ्या पडद्यावर रिलीज झालेत, ते म्हणजे ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘Openheimer’ आणि ग्रेटा गेरविग यांचा ‘Barbie’. जेव्हा या सिनेमाची रिलीज डेट समोर आली, तेव्हापासूनच चाहते या दोन्ही सिनेमांची आतुरतेने वाट पाहत होते. या दोन्ही सिनेमांची ऍडव्हान्स बुकिंग एक आठवड्याआधी सुरु झाली होती, त्यात ओपनहाइमर सिनेमाने बाजी मारली असून अनेक ठिकाणी बार्बीपेक्षा ओपनहाइमरला जास्त शोज मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. (Openheimer VS Barbie)
दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन हे हॉलीवुडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असून त्यांनी ‘बॅटमॅन : द डार्क नाईट’, ‘टेनेट’ सारखा अप्रतिम सिनेमे दिलेले आहेत. त्यामुळेच चाहत्यांना या नव्या सिनेमाकडून जास्त अपेक्षा आहे. नोलनच्या या सिनेमात सिलियन मुर्फी, रॉबर्ट डाउनी ज्यू. आदी मोठी नावं असून बार्बीमध्ये मार्गोट रॉबी आणि रायन गोसलिंग हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे या दोन तगड्या दिग्दर्शकाच्या कलाकृतींना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्साहित आहे. चाहत्यांनी या सिनेमांच्या टक्करला ‘Barbenheimer’ असं नाव दिलेलं आहे.
सिनेमाच्या ट्रेलरने रिलीजआधीच धुमाकूळ घातला असून सिनेमाचं एकूणच ट्रेलर पाहता ‘Barbie’ हा सॉफ्ट टाईपचा सिनेमा तर ‘Openheimer’ एका वेगळ्याच धाटणीचा सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमागृहात वातावरण एकीकडे थोडा हलका-फुलका असेल, तर दुसरीकडे थरारक व नाट्यमय. दोन्हीही सिनेमांच्या टीमने आपापल्या परीने प्रचंड मेहनत घेतली आहे.
हे दोन्ही सिनेमे सोशल मीडियावर प्रचंड ट्रेण्डिंगमध्ये असून दोन्ही सिनेमाचे मिम्सही जोरदार व्हायरल होत आहेत. शिवाय दोनही सिनेमाची प्रचंड क्रेझ असून दोनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. (Openheimer VS Barbie)
