‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘रमण राघव, ‘सत्या’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध व लोकप्रिय दिग्दर्शकांमध्ये अनुरागचा उल्लेख आवर्जून केला जातो. अनुराग कश्यप हा हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक असला तरी त्याने अनेक मराठी कलाकारांबरोबरही काम केले आहे. अनुराग हा त्याच्या चित्रपट व सीरिजमुळे जितका चर्चेत राहतो. तितकाच तो त्याच्या व्यक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत येत असतो. सध्या सोशल मीडियाबवर अनुराग कश्यपची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनुरागने मराठी अभिनेत्री अमृता सुभाषच्या नावाचा उल्लेख केला आहे.
अमृताच्या एका मॅनेजरमुळे अनुरागने अमृताला त्याच्या एका चित्रपटातून काढले होते. याबद्दल स्वत: अनुरागने ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. या मुलाखतीत त्याने असं म्हटलं की, “बॉलिवूडची आधीची परिस्थिती ही खूप वेगळी होती. आता सगळ्यांना बॉलिवूडमधून पैसे कमावणे हे खूप सोपं वाटतं. एका चित्रपटाची निर्मिती करून आपण खूप पैसे कमावू शकतो, असं त्यांना वाटतं. पण तसं नाही आहे. आता लोक खूप मागण्या करु लागले आहेत. काही वेळा या मागण्या कोण करत आहे हेच कळत नाही”.
यापुढे त्याने अमृता सुभाषविषयी बोलताना असं म्हटलं की, “मी एक चित्रपट करत होतो. याआधी मी तिच्याबरोबर तीन वेळा काम केले आहे आणि ती किती साधी आहे हेही मला माहीत आहे. पण त्यानंतर एका चित्रपटासाठी मी तिच्याबरोबर काम करत असताना मला तिच्या मॅनेजरकडून मागण्यांची एक भलीमोठी यादी पाठवण्यात आली. त्यामध्ये सिंगल डोअर व्हॅन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे” असं बरंच काही होतं. ते वाचून मी म्हटलं की, हा काय पागल आहे का?”
यापुढे अनुराग म्हणाला, “मी लगेच मॅनेजरला फोन करुन “मी अमृताऐवजी नवीन कलाकार घेत आहे. धन्यवाद” असं म्हटलं आणि फोन ठेवून दिला. त्यानंतर अमृताने मला फोन करून “काय झालं? मी काय केलं आहे?” असं विचारलं. तिला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तिला याबद्दल माहीतच नाही की तिच्यामागे मॅनेजरने इतक्या मागण्या केल्या आहेत. यानंतर ती “माझ्या वतीने हे सगळं सांगायची हिंमत कशी झाली” असं म्हणत त्याच्यावर ओरडली”.
आणखी वाचा – ‘तुला शिकवीन…’मधील अधिपती लेकीला देतो अधिकाधिक वेळ, मुलगी दिसते फारच क्युट, नावही ठेवलं आहे अगदी युनिक
यापुढे त्याने असं म्हटलं की, “हे फक्त एकदाच नाही तर असं अनेक कलाकारांच्या बाबतीत झालं आहे. पण मी अशा कलाकारांबरोबर काम करत नाही, मी त्यांना थेट माझ्या चित्रपटातून काढून टाकतो”. दरम्यान, अनुरागचा ‘बॅड कॉप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये हरलीन सेठी, सौरभ सचदेवा, ऐश्वर्या सुश्मिता यांच्याही भूमिका आहेत.