सध्या पंजाबी व बॉलिवूड गायक दिलजीत दोसांज खूप चर्चेत आहे. जगभरात दिलजीतचे अनेक कॉन्सर्ट आयोजित केले जातात. त्याच्या सर्व कॉन्सर्टला मोठ्या उत्साहाने चाहते हजेरी लावतात. त्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट ‘दिल-लुमिनाटी टूर’मुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामधून त्याच्यावरील चाहत्यांचे प्रेम स्पष्टपणे दिसते. अशातच नुकताच त्याच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला दिसून येत आहे. यामध्ये एक महिला त्याचे गाणे सुरु असताना रडताना दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या महिलेला ट्रोलही केले गेले. यावरुन आता चर्चा सुरु झाली आहे. (diljit dosanjh on crying female fan)
दिलजीतचा एक कॉन्सर्ट जयपूर व हैद्राबादमध्येही कॉन्सर्ट आयोजित केले होते. यावेळी अनेक महिलांचे रडतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ पाहून रडणाऱ्या महिलांना सोशल मीडियावर ट्रोलही केले होते. यावरुन आता स्वतः दिलजीतने या संदर्भात भाष्य केले आणि म्हणाला की, “भावनिक होणं बरोबर आहे. संगीत एक भावना आहे. यामध्ये हास्य आहे, नृत्य आहे, आपण रागावतो, रडतो अशा अनेक भावना आहेत. मीदेखील संगीत ऐकून बऱ्याचदा रडलो आहे. ज्यांच्यामध्ये भावना आहेत तेच लोक रडू शकतात. मी माझ्या महिला चाहत्यांच्या बाजूने आहे. या मुलींना कोणीही थांबवू शकत नाही. त्या स्वतंत्र आहेत. केवळ पुरुषच नाही तर महिलादेखील कमावतात. त्या कमवत असतील तर त्यांना आनंद घेऊदे”.
पुढे दिलजीत म्हणाला की, “तुम्ही त्यांचा अपमान करत आहात. तुमची देशाच्या लेकीचा अपमान करत आहात. हे पुन्हा नाही झालं पाहिजे. मी तुम्हाला सांगत आहे”. दरम्यान दिलजीतचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तसेच त्याने महिला चाहत्यांची बाजू घेऊन बोलल्याने चाहत्यांनी दिलजीतचे खूप कौतुक केले आहे.
दरम्यान दिलजीतचा हैद्राबाद येथे कॉन्सर्ट पार पडला. यावेळी तेलंगणा सरकारने नोटीस जारी करताना दिलजीतच्या ३ गाण्यांवर बंदी घातली होती. नोटीस पाठवून दिलजीत हैदराबादमधील त्याच्या लाइव्ह शोदरम्यान दारू, ड्रग्स, मादक पदार्थ किंवा हिंसेला प्रोत्साहन देणारी गाणी (पंज तारा, केस आणि पटियाला पेग) गाऊ नयेत असे सांगण्यात आले होते.