बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिचा फिटनेस, सौंदर्य म्हणजे क्या बात… माधुरीचा फिटनेस व तिची व्यायाम करण्याची पद्धत तर अनेक तरुण मंडळींसाठीही प्रेरणा आहे. प्रत्येक भूमिकेनुसार माधुरी स्वतःला बदलते. मात्र या सगळ्यात तिच्या फिटनेसमध्ये कधीच बदल होत नाही. डॉ. श्रीराम नेने यांच्यासह लग्न केल्यानंतर ती बराच काळ परदेशात राहत होती. तिथेही तिने स्वतःला अगदी फिट ठेवलं. पुन्हा ती दोन्ही मुलांसह भारतात स्थायिक झाली आहे. आता माधुरीसह तिचे पती श्रीराम नेनेही त्यांच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देत आहेत. त्यांनी तब्बल १८ किलो वजन घटवलं आहे. वजन कसं कमी केलं? याबाबत नेनेंनी सांगितलं आहे. (madhuri dixit husband weight loss journey)
१८ किलो वजन कसं घटवलं?
डॉ. श्रीराम नेने हे कार्डियाक सर्जन आहेत. ते माधुरीसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. इतकंच नव्हे तर युट्युबद्वारे विविध व्हिडीओ पोस्ट करत ते आरोग्यविषयक महत्त्वाच्या टिप्स देतात. मात्र त्यांचं स्वतःकडे बहुदा दुर्लक्ष होत होतं. श्रीराम यांच्या आरोग्य तपासणीमध्ये थोडीफार गडबड होती. दरम्यान मित्रांनीही त्यांना आरोग्याची अधिकाधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला. श्रीराम नेनेंनी यावेळी स्वतःकडे लक्ष देण्याचं ठरवलं.
दारू सोडली आणि…
श्रीराम नेने म्हणाले, “९ ते १० महिन्यांपूर्वी मी पूर्णपणे मांसाहार खाणं सोडलं. तसेच दारू पिणंही बंद केलं. पूर्णपणे विगन होण्याचा निर्णय घेतला आणि तेच केलं. यामुळे माझं १८ किलो वजन कमी झालं. याचा चांगला परिणाम माझ्या शरीरावर झाला”. श्रीराम यांनी कठोरपणे सगळ्या नियमांचे पालन केलं. शारीरिकदृष्ट्या अधिक सुदृढ होण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांचा हा प्रयत्न अगदी यशस्वी झाला आहे. ते स्वतःसाठी डॉक्टर झाले असं श्रीराम यांचं म्हणणं आहे.
श्रीराम यांनी त्यांच्या वडिलांबाबतही असंच काहीसं केलं होतं. त्याच अनुभवाबाबत ते म्हणाले, “माझ्या वडिलांबाबातही मी असाच प्रयोग करुन पाहिला. या प्रयोगामुळे त्यांचीही तब्येत सुधारली. ५५ वर्षांपासून माझे वडील मधुमेहामुळे त्रस्त होते. त्यांची सगळं औषधं बंद करुन वैद्यकीय पद्धतींचा आधार घेतला”. श्रीराम यांचे वडील आता ८१ वर्षांचे आहेत आणि अगदी उत्तम आयुष्य ते जगत आहे. हे श्रीराम यांनी स्वतःच सांगितलं.