सुप्रसिद्ध आध्यात्मिक नेते सद्गुरू म्हणजेच जग्गी वासुदेव यांची प्रकृती चिंताजनक आहे. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात असून सद्गुरुंच्या डोक्यात ‘जीवघेणा’ रक्तस्त्राव झाल्यानंतर त्यांच्या मेंदूची आपत्कालीन शस्त्रक्रिया झाली आणि आता ते बरे होत आहेत. सद्गुरूंच्या चाहत्यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली. अशातच आता अभिनेत्री कंगना रणौतही त्यांच्या तब्येतीबद्दल बोलली आहे. अभिनेत्री म्हणाली की, “ते आपल्यासारखेच हाडे, रक्त व मांसाचे बनलेले आहेत”. (Kangana Ranaut On Sadhguru Health)
कंगना रणौत अनेकदा सद्गुरुंबरोबरच्या तिच्या भेटी आणि ईशा फाऊंडेशन, कोईम्बतूर येथे झालेल्या भेटींचे फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीने बुधवारी रात्री ट्विट केले की, “आज जेव्हा मी सद्गुरुजींना ICU मध्ये बेडवर पडलेले पाहिले तेव्हा अचानक त्यांची स्थिती पाहून मी प्रभावित झाले. याआधी मला असे कधीच वाटले नव्हते की, आमच्यासारखे तेही हाडे, रक्त व मांसाचे बनलेले आहेत”.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला वाटले की देव कोसळला आहे, ही पृथ्वी हलली आहे, आकाश मला सोडून गेले आहे. हे सर्व पाहून मला परिस्थिती समजणं कठीण झालं आहे. यावर मला विश्वास ठेवणंही कठीण झालं आहे. अचानक मी हे सर्व पाहून तुटले आहे. मला माझ्या वेदना तुम्हा सर्वांसह शेअर करायच्या आहेत. ते बरे होतील अन्यथा सूर्य उगवणार नाही, पृथ्वी हलणार नाही”, असं ती म्हणाली.
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये सद्गुरु यांच्यावर मेंदूची आपत्कालीन शस्त्रक्रिया झाली. बुधवारी सद्गुरूंनी त्यांच्या हॉस्पिटलच्या बेडवरून इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तेव्हा ते म्हणाले, “अपोलो हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जनने काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी माझा मेंदू कापला पण त्यांना काहीही सापडले नाही. मी इथे दिल्लीत आहे, माझ्या डोक्यावर पट्टी बांधली आहे पण माझ्या मेंदूला इजा झालेली नाही”.