गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाईल्स’. या चित्रपटात काश्मिरी पंडितांची कशा प्रकारे क्रूर हत्या केली गेली हे या चित्रपटातून चित्रित करण्यात आलं होतं. आता या चित्रपटावर बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी निर्मात्यांबद्दल नाराजी व्यक्त करत या चित्रपटातून मिळालेल्या नफ्यातून निर्मात्यांनी जम्मू-कश्मीरमधील हिंदूंच्या कल्याणासाठी किती योगदान दिलं, असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Asha parekh statement on the Kashmir files)
‘न्यून १८’ला दिलेल्या मुलाखतीत आशा यांना ‘द कश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांच्या वादांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना आशा म्हणाल्या, “मी ते चित्रपट पाहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरील वादाबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. जर लोक हे चित्रपट पाहत असतील तर त्यांनी ते पाहावे”.
‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली त्याबाबत तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न त्यांना केला गेला. त्यावर आशा म्हणाल्या, “होय, लोकांनी तो चित्रपट पाहिला. मी थोडं वादग्रस्त वक्तव्य करते. या सिनेमाच्या निर्मात्याने ४०० कोटी कमवले. पण त्यांनी काश्मिरी पंडितांना, हिंदूंना ज्यांच्याकडे पैसे नाहीत, पाणी नाही त्यांना यातले किती पैसे दिले?, आपण असं समजू की चारशे कोटीमधील सगळे पैसे काही त्यांना मिळाले नसतील. २०० कोटी इतरांसाठीच्या कमाईत खर्च झाले असतील. तर २०० कोटी कमवले असतील. त्यातले ५० कोटी तरी हाल सहन करणाऱ्या काश्मिरी हिंदूंना त्यांनी दिले का ?”, असा प्रश्न उपस्थित केला.
आता यानंतर चित्रपट दिग्दर्शक व निर्माता विवेक अग्निहोत्री हे ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या या परखड प्रश्नाचं उत्तर कशाप्रकारे देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आशा यांच्या या वक्तव्यामुळे कोणता नवा वाद निर्माण होतो हे ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. सध्या त्यांचं वक्तव्य सोशल मीडियावर बरंच व्हायरल होत आहे.