बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीचा चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ १५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा २००२ घडलेल्या गोध्रा घटनेवर आधारित आहे. ज्यात विक्रांतने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. धीर सरना दिग्दर्शित साबरमती रिपोर्टची सुरुवात काहीशी संथ गतीने होती. रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुस-या दिवशी हा आकडा वाढून २.१० कोटी झाला. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईला चांगलाच फायदा झाला. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ३ कोटींची कमाई केली आहे. (The Sabarmati Express Movie OTT News)
सध्या तरी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कुणी हा चित्रपट प्रोपगंडा चित्रपट असल्याचे म्हटलं आहे तर काहींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाची कथा आवडली आहे. त्यांनी खास एक्सवर पोस्ट शेअर करून चित्रपटाचे कौतुक केले आहे. दरम्यान चित्रपटगृहांमध्ये संमिश्र प्रतिसादात सुरु असलेला हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येणार आहे. चित्रपटाचा ओटीटी वितरक झी स्टुडिओ आहे.
त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहांनंतर झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख आणि प्लॅटफॉर्मबद्दल अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. नियमांनुसार चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चार आठवड्यांनंतरच चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतो. पण जर चित्रपटाने चांगले कलेक्शन केले तर निर्माते हा कालावधी आणखी वाढवू शकतात. त्यामुळे आता साबरमती चित्रपटगृहांमध्ये किती गल्ला जमवतो हे येत्या काही दिवसांत समोर येईल.
दरम्यान, ’12th Fail’ या चित्रपटाच्या यशानंतर विक्रांत मेस्सीने ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये ही उत्तम अभिनय केला आहे. गोध्रा घटनेवेळी नेमकं काय घडलं आणि मीडियाने ते कशा पद्धतीने दाखवलं हे या चित्रपटात दाखवले आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती. येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.