रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरु आहे. रितेश चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारीही तोच सांभाळत आहे. सध्या ‘राजा शिवाजी’चं चित्रीकरण साताऱ्यात सुरु आहे. मात्र या चित्रीकरणाला आता गालबोट लागलं आहे. साताऱ्यात माहुली संगममध्ये ‘राजा शिवाजी’चं शूट सुरु होतं. मात्र या शूटदरम्यान रितेशच्या सहकलाकाराचा दुर्देवी मृत्यू झाला. शूट लोकेशनच्या जवळच असणाऱ्या कृष्णा नदीमध्ये तो युनिटच्या काही मंडळींसह पोहायला गेला होता. तिथेच त्याला मृत्यूने गाठलं. आता तब्बल ३६ तासांनंतर त्याचा मृतदेह हाती आला आहे. (Riteish deshmukh movie set junior artist death)
नदीत पोहण्याचा मोह आवरला नाही अन्…
सौरभ शर्मा असं या कलाकाराचं नाव होतं. सौरभ डान्सर असल्याचं काही वृत्तांमधून समोर आलं होतं. साताऱ्यातील संगम माहुलीमध्ये दोन दिवसांच्या शूटनंतर पॅकअर करण्यात आलं. दरम्यान तेथील नदीमध्ये सौरभला पोहण्याचा मोह आवरला नाही. पोहताना तो नदीपात्रातच हरवला. नदीमध्ये गेला असताच त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सेटवरील मंडळीही हैराण झाली.
३६ तासांनंतर मृतदेह हाती
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, ३६ तासांनंतर सौरभचा मृतदेह हाती आला आहे. साताऱ्यातील शिवेंद्रराजे रेस्क्यु टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड ट्रेकर्स यांनी शोधमोहीम सुरु ठेवली होती. दरम्यान त्यांच्या या शोधमोहीमेला यश मिळालं. ज्यादिवशी ही घटना घडली त्याच दिवशी सौरभला शोधण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली होती. सौरभबाबत कळताच रितेशसह जिनिलिया देशमुखही घटनास्थळी पोहोचले होते.
आणखी वाचा – सहकलाकार नदी बुडाला ऐकून रितेश देशमुखने बायकोसह घटनास्थळी धाव घेतली अन्…; अजूनही मृतदेह हाती नाही कारण…
सौरभ हा घाटकोपर पश्चिम भागात राहणारा आहे. तसेच तो मुळ राजस्थानचा आहे. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही या घटनेची विशेष दखल घेत शोधमोहीम सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. ‘राजा शिवाजी’च्या सेटवर सौरभ ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होता. या घटनेनंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्यातरी सौरभच्या जाण्याने ‘राजा शिवाजी’च्या सेटवर दुःखाचं सावट पसरलं आहे. त्याचबरोबरीने तात्पुरता चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.