rajkumar rao and patralekha : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रटी जोडप्यांनी या वर्षात गुडन्यूज दिल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच कतरीना कैफ आणि विकी कौशल यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याने गुडन्यूज दिली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही आता गुडन्यूज दिली आहे. ते दोघंही आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालेलं आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालेलं आहे.
तसेच राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन चाहत्यांसह ही गुडन्यूज शेअर केली आहे. आमच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी देवाने आम्हाला हे सर्वात सुंदर गिफ्ट, आशिर्वाद दिले. असं म्हणत त्यांनी मुलीच्या जन्माची गोड बातमी पोस्ट केली आहे. आजच (15 नोव्हेंबर) त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशीच त्यांच्या लेकीचा जन्म झाल्याने राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते आणि इतर सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
काही महिन्यांपूर्वीच राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली होती. ‘Baby on the Way’ असं लिहीलेला फोटो शेअर करत Elated अशी कॅप्शन लिहीत त्यांनी चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली. त्यानंतर आज, १५ नोव्हेंबर रोजी त्या दोघांनी घरी चिमुकल्या लेकीचे आगमन झाल्याची गुड न्यूजही शेअर केली.
राजकुमार राव त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आजवर अनेक चित्रपटात त्याने उत्तम काम केले आहे. तर अभिनेत्री पत्रलेखा हिनेही अनेक चित्रपटातून तिच्या अभिनायची जादू दाखवली आहे. त्या दोघांनी सर्वात पहिले, ‘सिटीलाइट्स’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र सिटीलाईट्स मूव्हीनंतर ही जोडी चित्रपटात पुन्हा एकत्र दिसली नाही. ते जवळपास 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अखेर 4 वर्षांपूर्वी, म्हणजे 15 नोव्हेंबर 2021 रोजी दोघांनी पारंपरिक बंगाली पद्धतीने चंदीगड येथे लग्नगाठ बांधली.





