Bishnoi Community On Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिलेल्या धमक्यांचे प्रकरण अद्याप थंडावले नाही. तोच बिश्नोई समाज पुन्हा एकदा भडकला असल्याचं समोर आलं आहे . सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या पुतळ्यांचे दहन करत या बिश्नोई समाजाने जोरदार निषेध केला. सलीम खान यांनी नुकतेच एक विधान केले होते, ज्यामध्ये त्यांनी सलमान काळ्या हरण प्रकरणात निर्दोष असल्याचे म्हटले होते. हरणाची शिकार झाली तेव्हा सलमान तिथे नव्हता. या प्रकरणातील सलमानवरील सर्व आरोप मागे घेण्यात आले, मात्र बिश्नोई समाज अजूनही सलमानच्या माफीवर ठाम आहे.
‘आयएएनएस’च्या वृत्तानुसार, जोधपूरच्या विविध भागात बिश्नोई धर्माचा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी आंदोलक एकत्र आले. जर सलमान खरोखरच निर्दोष असेल तर त्याला दिल्ली, मुंबई आणि जोधपूर येथील वकिलांची गरज काय होती, असा सवाल बिश्नोई समाजाच्या सदस्यांनी उपस्थित केला. सलमानने माफी मागितली नाही, तर सनातन हिंदू समाज त्याच्याविरोधात आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आपला मुलगा सलमान निर्दोष असल्याचा सलीम खानचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे बिष्णोई समाजाने म्हटले आहे. कारण २६ वर्षांपूर्वी खटला सुरु झाला तेव्हा अनेक मान्यवर उपस्थित होते.
आणखी वाचा – Zee Marathi Awards 2024 : सोहळ्यात ‘या’ अभिनेत्रीने पटकावले अनेक पुरस्कार, लक्षवेधी चेहरा ठरला…; वाचा यादी
बिश्नोई समाजाचे सदस्य म्हणाले, “आम्ही बिश्नोई आहोत, आम्ही अशी कोणाचीही बदनामी करत नाही. २६ वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला तेव्हा बिश्नोई समाजातील तत्कालीन आमदारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सलीम खान खोटी विधाने करुन लोकांची दिशाभूल करु शकत नाहीत”. ते पुढे म्हणाले, “सलीम खान यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण समाज दुखावला गेला आहे. काळ्या हरण प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु. रस्त्यावर उतरुन आंदोलनही करु. लॉरेन्स बिश्नोई हा त्याच्याच समुदायाचा असून तो त्याचे सर्व २९ नियम पाळतो”, असेही त्याने सांगितले.
१९९८ मध्ये काळवीट शिकार केल्यापासून लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे लागला होता आणि त्याने त्याला अनेकदा धमक्या दिल्याची माहिती आहे. त्याने अलीकडेच सलमानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या केली आणि यामागे सलमानबरोबरची मैत्री असल्याचे सांगितले. यानंतर सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.