Zee Marathi Laxmi Niwas : ‘झी मराठी’ वाहिनी नेहमीच विविध आशयघन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘झी मराठी’ वाहिनी ही टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. ‘झी मराठी’ वाहिनी आणि प्रेक्षकांचे बऱ्याच वर्षांपासूनचे ऋणानुबंध असलेले पाहायला मिळतात. गेली २५ वर्ष ही वाहिनी नवनवीन मालिका घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसली. नात्यांची परंपरा जपणारी अनेक विषय हाताळत ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या जवळची राहिली. आता ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या आयका नव्या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. हो. ही नवी मालिका काही दिवसातच सुरु होणार असून या मालिकेचे नाव ‘लक्ष्मी निवास’ आहे.
‘झी मराठी’ नात्यांचा पुरस्कार सोहळा २०२४ नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी या नव्या मालिकेची टीम ही येथे उपस्थित असलेली पाहायला मिळाली. काल या मालिकेचा पहिला प्रोमो सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला. अखेर हा प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतंय की, या नव्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेते तुषार दळवी ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहणारं वयोवृद्ध जोडपं लक्ष्मी व श्रीनिवास यांच्या आयुष्यावर बेतलेली गोष्ट ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दाखवण्यात आली आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये हे वयोवृद्ध जोडपं एका जुन्या स्कूटरवरुन प्रवास करताना दिसत आहे. कुटुंब, नोकरी, मुलींची थाटामाटात लग्न, पैशांची जुळवाजुळव या सगळ्या जबाबदाऱ्या निभावून आता लक्ष्मी व श्रीनिवास त्यांचं हक्काचं घर कसं बांधणार याचा प्रवास या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – “तुला बघून खूप बरं वाटलं”, अंकिताच्या आईचा सूरज चव्हाणला व्हिडीओ कॉल, म्हणाला, “मी आहे ना तिचा भाऊ आणि…”
“एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या सोबतीनेच बनतं ‘लक्ष्मीनिवास’!” असं कॅप्शन देत झी मराठी वाहिनीने याचा पहिला प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. मालिकेत आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र प्रोमोमधील फोटोवरुन मालिकेत दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय.