सध्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसरे सीजन खूपच गाजले आहे. यामध्ये अभिनय, पत्रकार, सोशल मीडिया स्टार, युट्यूबर क्षेत्रातील अनेकांचा समावेश आहे. यावेळी अधिक लक्षवेधी ठरले ते म्हणजे युट्यूबर अरमान मलिक व त्याच्या दोन पत्नी पायल मलिक व कृतिका मलिक. तिघांच्याही एंट्रीने कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर मोठ्या प्रमाणात नाराजीदेखील व्यक्त करण्यात आली होती. यांचे पडसाद सोशल मीडियावरही अधिक प्रमाणात उमटले होते. गेल्या आठवड्यात पायल नॉमिनेट झाली होती. त्यानंतर तिचा व्हिडीओदेखील अधिक चर्चेत आला होता. अशातच आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात अशी काही घटना घडली ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (vishal pandye parents on arman malik )
विशाल पांडे हा सोशल मीडिया स्टारदेखिल या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. पायलने अरमानना विशालबद्दल असे काही सांगितले की ज्यामुळे अरमानचा पार चढला. तो कृतिकाबद्दल असे काही बोलला ज्यामुळे अरमानचे त्याच्या बरोबर भांडण झाले आणि त्याच्या कानशिलातही लगावली. यामुळे आता या प्रकरणाची सोशल मीडियावर अधिकच चर्चा सुरु झाली. काही जणांनी अरमान अरमानने त्याच्या पत्नीसाठी असे केल्याचे सांगत समर्थन केले तर काही जणांनी अरमानला ट्रोल केले आहे. अशातच आता विशालच्या आई-वडिलांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते आपल्या मुलाला पाठिंबा देताना दिसत आहेत. तसेच त्यांनी अरमानला शोमधून काढण्याची मागणीदेखील करत आहेत.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विशालचे आई-वडील भावूक झालेले दिसत आहेत. त्याची आई म्हणते की, “बिग बॉस तुम्हाला आमची विनंती आहे की ज्या माणसाने आमच्या मुलावर हात उचलला त्याला घराच्या बाहेर काढा. आतापर्यंत आम्ही आमच्या मुलांवर हात उचलला नाही. खूप प्रेमाने आम्ही त्याला वाढवले आहे. विशालवर कोणीही हात उचलावा म्हणून आम्ही त्याला ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये पाठवले नव्हते. आम्हाला हे सहन होत नाही आहे. जेव्हापासून मी हे ऐकलंय तेव्हापासून मला ठीक नाही वाटत आहे”.
त्यानंतर त्याच्या वडिलांनी सांगितले की, “माझ्या मुलावर जे आरोप लावले जात आहेत ते चुकीचे आहेत. एखाद्याचे कौतुक करण्यात चुकीचे काय आहे? विशालचा स्वभाव असा नाही. अरमानने माझ्या मुलाच्या कानशिलात लगावली आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या निर्मात्यांना एकच विनंती आहे की त्या गुन्हेगाराला कार्यक्रमातून बाहेर काढा. आमचे कुटुंब असे नाही. आम्ही खूप साधी माणसं आहोत. माझा मुलगा खूप कष्ट करुन इथवर पोहोचला आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे”. दरम्याने या प्रकरणाला नेमके कोणते वळण लागणार हे पाहाण्यासारखे आहे.