सध्या ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व खूप चर्चेत आले आहे. सध्या या पर्वाचा सातवा आठवडा सुरु आहे. आजवर यामधून काही स्पर्धकदेखील बाहेर पडलेले दिसून आले आहेत. यामधील स्पर्धकांमध्ये वाद-विवाद, हाणामाऱ्या, शाब्दिक वाद, आरोप-प्रत्यारोप असे प्रकार घडताना दिसून येत आहेत. या कार्यक्रमाचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये स्पर्धक एकमेकांबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यामुळे याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सुरजबद्दल चर्चा होताना दिसून येत आहेत. (Bigg Boss Marathi Season 5)
‘बिग बॉस’ सुरु झाल्यानंतर सुरज चव्हाण हा चांगलाच चर्चेत राहिला आहे. त्याच्या साधेपणामुळे सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. त्याचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहेत. त्याच्या खेळानेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हीडीओदेखील व्हायरल होताना दिसतात. खूप कमी कालावधीमध्ये त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली. घरातील स्पर्धकांचाही तो लाडका झाला. मात्र आता त्याच्याबद्दल खूप चर्चा होताना दिसून येत आहे.
सध्या ‘बिग बॉस’मध्ये एक टास्कमध्ये हरल्याने अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, आर्या जाधव व वैभव जाधव यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा मिळाली असताना सूरजने केलेल्या भाष्याची आता चर्चा होताना दिसून येत आहे. हे सर्वजण बसून सूरजबद्दल चर्चा करत आहेत. वैभव म्हणतो की, “सूरज काहीतरी वेगळंच वागत होता. मी त्याला किचनमध्ये भेटलो आणि म्हणालो की सूरज हे तू चुकीचं करत आहेस. तुझं हे वागणं मला पण नाही आवडणार आणि घरातील कोणालाच नाही आवडणार”.
पुढे त्यावर अंकिता म्हणाली की, “तो पहिल्यांदा चिडत होता. मग मी त्याला म्हंटले की तू चुकीचं वागलास. तू मला कॅडबरी भरवायला आलास. पण मी कॅडबरी खाल्ली नाही आणि मी त्याच्या हातात दिली. पण तो ऐकूनच घ्यायला तयार नव्हता. त्याला जेव्हा त्याची चूक सांगितली तेव्हा तो विचित्र वागायला लागला. डोक्यावर मारुन घेऊ लागला. जे मला अजिबात आवडलं नाही”. त्यावर आर्या म्हणाली की, “सगळीकडे कॅमेरा लागले आहेत. त्यामुळे खर काय आहे? ते समजेलच”. दरम्यान आता घरात सूरजबद्दल नक्की काय पडसाद उमटतील हे आता पाहाण्यासारखे आहे.