Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची सर्वत्र चर्चा सुरु असून अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमध्ये वाद सुरु असलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत. वर्षा यांचं सुरुवातीला निक्की तांबोळीबरोबर बराच वाद झाला. त्यावेळी भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुखने वर्षा यांची निक्कीला माफीही मागायला लावली. निक्कीच वर्षा यांच्याबरोबरच भांडण पाहून प्रेक्षकांनीही नाराजीचा सूर दाखवला. हे प्रकरण निवळत असताना आता आणखी एका स्पर्धकाने वर्षा यांचा अपमान केला असल्याचं पहायला मिळत आहे.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने वर्षा यांचा अपमान केला असल्याचं पाहायला मिळालं. सिनेसृष्टीत काम करुनही जान्हवीने वर्षा यांच्या ऍक्टिंगवर शंका घेतली यामुळे पुन्हा एकदा संबंध महाराष्ट्र जान्हवीला ट्रोल करताना दिसत आहे. गार्डन एरियामध्ये जान्हवी, निक्की, वैभव सर्वजण एकत्र बसून गप्पा मारत असतात. तेव्हा जान्हवी आर्याला उद्देशून निर्लज्ज असं म्हणते. हे वर्षा ताई ऐकतात, आणि तेव्हा वर्षा उसगांवकर दुसऱ्या ग्रुपबरोबर बाजूला बसल्या होत्या. त्यावेळी त्या ‘निर्लज्जम समर्पयामि’, असं म्हणतात.
वर्षा ताई यांचे शब्द ऐकताच जान्हवी वर्षाताईंवर भडकते. ती वर्षा ताईंसमोर येते आणि म्हणते, “ताई मी तुमचा पहिल्या दिवसापासून आदर करत आली. माझ्या नादी लागू नका. पोरं बसतात तिथे तुम्ही केस उडवत येता. तुमची घाणेरडी ऍक्टिंग मला नका दाखवू”, असं म्हणत ती वर्षा यांना सुनावते. यावर वर्षा ताईही काही गप्प बसत नाहीत. जान्हवी बोलत असताना वर्षा उसगांवकर तिच्या प्रत्येक वाक्याला प्रतिउत्तर देताना दिसत आहेत. या भांडणादरम्यान वर्षा ताई म्हणतात, “मी इथे १०० दिवस टिकणार नंतर बाहेर जाणार, फालतू गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते. काय तुझी ही गलिच्छ भाषा. याच ऍक्टिंगमुळे मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तोही तीन वेळा”.
हे बोलल्यानंतर जान्हवी प्रतिउत्तर देत म्हणते, “तुम्हाला पुरस्कार देणाऱ्यांना आज पश्चाताप होत असेल की, आपण कोणाला पुरस्कार दिला म्हणून”.असं म्हणत स्पर्धक हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. वाद टोकाला जाताना पाहून ‘बिग बॉस’च्या घराची कॅप्टन अंकिता भांडण शांत करण्याचा प्रयत्न करते. “तू त्यांच्या ऍक्टिंगला नको बोलू”, असंही वर्षा ताई यांचा आदर ठेवत अंकिता जान्हवीला म्हणते.