‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदाची पहिली वाइल्ड एण्ट्री झालेली पाहायला मिळाली. गेल्या सहा आठवड्यापासून घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोणता स्पर्धक येणार याबद्दल चर्चा रंगली होती. अखेर सर्व चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून कोल्हापूरचा रांगडा गडी संग्राम चौगुलेने घरात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एण्ट्री घेतली आहे. मनगटात ताकद, बोलण्यात वजन, वागण्यात कोल्हापुरी बाणा असलेल्या बलवान आणि आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या संग्राम चौगुलेच्या एण्ट्रीने स्पर्धकांचे धाबे दणाणले आहेत. (Bigg Boss Marathi season 5)
अशातच ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ असं म्हणत आहेत की, या पाण्यात असे सदस्य पडतील जे सदस्य अपात्र आहेत. दरम्यान अपात्र सदस्यांनी पाण्यात उड्या घेतलेल्या दिसल्या. मात्र निक्कीवर जेव्हा अपात्र होत पाण्यात उतरायची वेळ आली तेव्हा निक्कीने कारण देत, “मेडिकल कंडिशनमुळे पाण्यात उतरु शकत नाही”, असं म्हटलं. निक्कीने पाण्यात उडी टाकायला स्पष्ट नकार दिला. आणि याच कारणही तिने मेडिकल कंडिशन असल्याचं सांगितलं.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’मध्ये Wild Card स्पर्धक म्हणून संग्राम चौगुलेची एण्ट्री, घरात प्रवेश घेताच दिली धमकी अन्…
त्यावर ‘बिग बॉस’च्या घरात आलेल्या नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाने निक्कीच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. संग्राम निक्कीला बोलला, “‘बिग बॉस मी यांना ढकलणार आहे”, असं म्हणतो. यावर निक्की त्याला उत्तर देत, “हे तू मला सांगूच शकत नाहीस”, असं म्हणते. त्यावेळी संग्राम पुढे येतो आणि निक्कीला धक्का देत पाण्यात ढकलतो. तेव्हा निक्की जोरात किंचाळते. त्यानंतर निक्कीचा राग अनावर होतो. पाण्यातून बाहेर आल्यानंतर निक्की संग्रामला बोलते, “तू नाही माझ्याआधी घराबाहेर निघाला तर मी माझं नाव बदलेन”.
वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केलेल्या संग्रामने ‘बिग बॉस’च्या घरात येताच रंग दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी पहिल्याच टास्कमध्ये संग्रामने निक्की तांबोळीला तिची जागा दाखवली. इतके दिवस निक्कीचा अरेरावीपणा ‘बिग बॉस’च्या घरात सुरु होता आता मात्र तिला उत्तर द्यायला, तिच्या विरोधात लढायला संग्रामची एण्ट्री झालेली पाहायला मिळतेय.