Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ नेहमीच चर्चेत राहिलं. या पर्वात स्पर्धक मंडळींनी तुफान धमाल-मस्ती केलेली पाहायला मिळाली. भाऊच्या धक्क्यावरही स्पर्धकांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली. दरम्यान, या पर्वात एका स्पर्धकाची ‘बिग बॉस’ने चांगलीच शाळा घेतली ती म्हणजे जान्हवी किल्लेकर. जान्हवीने पॅडी कांबळेचा केलेला अपमान साऱ्यांनाच खटकला. यावेळी जान्हवीने पॅडी कांबळेंना ओव्हर ऍक्टिंग करतात असं म्हटलं. यावर रितेशने जान्हवीची चांगलीच शाळा घेतली. जान्हवीला जेलमध्ये पाठवत शिक्षाही सुनावली. मात्र पॅडी यांनी ही सगळी बाजू समजून घेत तिला माफही केलं.
काही दिवसांपूर्वीचं ‘बिग बॉस’च्या घरातून पॅडी कांबळेंची एक्झिट झाली. घरातून बाहेर आल्यानंतर पॅडी कांबळे आणि त्यांची जिवलग मैत्रीण विशाखा सुभेदार यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर चर्चा केली. पॅडी कांबळे यांनी जान्हवीने केलेल्या अपमानाबत यावेळी भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, “या अगोदर माझ्याबाबतीत अशा प्रकारचे अनुभव मी घेतले आहेत. माझ्या दिसण्यावरुन, माझ्या उंचीवरुन गमतीत बोललं गेलं आहे. आता त्यांच्यासाठी ही गमतीची गोष्ट असते पण आपल्याबद्दल बोलल्यामुळे थोडं मन दुखावलेलं असतं. तर त्या गोष्टींची सवय मला होती”.
पुढे त्यांनी असं म्हटलं की, “मधल्या काळात जसा आपल्या कामाचा व्याप वाढतो, फेम वाढतो, अवॉर्ड्स मिळतात तेव्हा या गोष्टी कमी होऊन तुमच्यातील नट प्रेक्षकांना दिसतो. त्यामुळे मला त्या गोष्टींची सवय आहे. कदाचित हे माझ्या तोंडावर नसतं झालं, भडका उडाला असता वा नाही. माझ्या उपरोक्ष ती गार्डन एरियामध्ये बोलली. तेव्हा आर्या हे मला सांगायला आली. दादा ही तुमच्याबद्दल अशी बोलते. तेव्हा मी आर्याला शांत केलं पण तरी ती पुन्हा तिच्याशी भांडायला गेली. एकतर जान्हवीने कधी विनोदी काम केलं नसावं, कारण विनोदी अभिनय करताना कधी कधी ओव्हर ऍक्टिंग करावी लागते”.
पुढे ते असंही म्हणाले की, “आणि हा विनोदी काम करण्याचा हा भाग आहे. आणि त्याप्रकाराचं काम अर्थात जान्हवीने केलं नसावं म्हणून तिला ती ओव्हर ऍक्टिंग वाटली असावी. पण जर हे तिने मलाच म्हटलं असेल, तर मी हेच म्हणेन, ती खूप मोठी अभिनेत्री होवो. आणि उद्या पॅडी कांबळे तिच्यासमोर आला तर हा ओव्हर ऍक्टर आहे त्यामुळे याच्याबरोबर काम करता येणार नाही एवढा स्टॅन्ड तिने घ्यायला हवा”. एकूणच पॅडी कांबळे यांनी जान्हवीला माफ केलं असलं तरी त्यांच्या मनात ही गोष्ट कायम सलत राहील, असं त्यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट होत आहे.