‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिनेत्री योगिता चव्हाणची एण्ट्री पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’सुरु होऊन अवघे एक-दोन दिवस झाले आहेत मात्र योगिता तितकी चर्चेत आलेली दिसली नाही. सध्या योगिता इतर स्पर्धकांबद्दल जाणून घेताना दिसत आहे. त्यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. जीव माझा गुंतला या मालिकेमुळे योगिताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौगुले ही जोडी चर्चेत आलेली पाहायला मिळाली. या मालिकेनंतर योगिता कोणत्याही मालिकेत झळकली नाही तर ती थेट ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसली. (Yogita Chavan Bigg Boss Journey)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर योगिताला माहेर तसेच सासरच्या मंडळींकडून उत्तम पाठिंबा मिळाला. याबाबतच तिने सांगितलं की, “माझ्या घरातले सगळेच खुश होते. माझ्या घरचे, सौरभचे(पती) आई-वडीलही खूश आहेत. त्यांना समजावून या शोमध्ये आले. त्यांनीही समजून घेतलं कारण सगळेच खूप समजूतदार आहेत. तू जा भीड, लढ अशी सगळ्यांची प्रतिक्रिया होती. माझे मित्र-मंडळीही खूप खुश आहेत. तू चालली आहेस ‘बिग बॉस’मध्ये?, तू या निर्णयावर ठाम आहेस ना…अशा त्यांच्याही प्रतिक्रिया होत्या. जो तो येऊन अशी वाग, हे करु नको ते करु नको असं सतत सांगत होता. सगळेच येऊन अशावेळी शिकवायला लागतात. या घरात कसं वागायचं? हे सांगत असतात. पण इथे काय घडणार हे देवालच माहित”.
‘बिग बॉस मराठी’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिने शेवटचा कॉल कोणाला केला? याबाबतही सांगितलं. योगिता म्हणाली, “घरात येण्यापूर्वी शेवटचा कॉल मी माझ्या बाबांना केला. माझा नवरा माझ्याबरोबरच होता. त्यामुळे त्याला फोन करण्याचा प्रश्न येत नाही. माझे बाबा फार घराबाहेर पडत नाहीत. बिग बॉस काय आहे हेही त्यांना फार माहित नाही. टीव्हीही ते फार बघत नाहीत. मी जात आहे, शंभर दिवस मी नसणार आहे. मी जाऊ का? त्यांनी “जा” इतकंच उत्तर दिलं. माझे वडील असेच आहेत”.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून ही सौरभ व योगिता ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली. मालिकाविश्वातील ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही एकत्र आली. विवाह होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली कोणत्याच माध्यमाद्वारे दिली नव्हती. तर थेट लग्न सोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात योगिता काय धुमाकूळ घालणार?, हे पाहणं रंजक ठरेल.