‘बिग बॉस मराठी’च्या घरात एका स्पर्धकाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. टिक टॉक स्टार म्हणून कार्यरत असणारा सूरज चव्हाण टिक टॉक बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर रिल व्हिडीओ बनवत त्याने आपली ओळख वाढू दिली. टिक टॉकच्या दुनियेत सूरज चव्हाण हा प्रसिद्ध रील स्टार पैकी एक होता. सोशल मीडियावर सूरज चव्हाणचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. असाच हा सूरज चव्हाण आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात खेळताना दिसतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून सूरज चव्हाणला भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळी ही सूरजला पाठिंबा देताना दिसतात. (Bigg Boss Marathi Season 5)
एका खेडेगावातून आलेल्या सूरजला या झगमगत्या दुनियेत वावरताना पाहून साऱ्यांनाच आनंद होतोय. सुरुवातीला गेम कळत नसला तरी माणसं ओळखणारा हा सूरज त्याच्या स्वभावामुळे त्याच्या वागण्या चालण्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करु शकला. रितेश भाऊंनी ही भाऊच्या धक्क्यावर सूरजचं भरभरुन कौतुक केलेल पाहायला मिळालं. भाऊच्या धक्क्यावर प्रत्येक आठवड्यात सूरजला योग्य तो न्याय मिळाला. सध्या टीम बी मधून सूरज उत्तम खेळ खेळताना दिसतोय. यावेळी डीपी दादा, अंकिता, अभिजीत सगळे स्पर्धक सूरजला सांभाळून घेत त्याला गेम समजावून सांगत असतात. आणि त्याला खेळायला लावतात.
लिहिता वाचता न येणारा सूरज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जेष्ठ कलाकार मंडळींसह वावरताना दिसतोय आणि ही नक्कीच त्याच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गावाकडून आलेल्या सूरजला कोणत्या लक्झरी गोष्टींची सवय नाहीये. त्यामुळे तो जसा आहे तसाच ‘बिग बॉस’च्या घरात वावरताना दिसतोय. अशातच ‘बिग बॉस’ यांनी नुकतंच स्पर्धकांना असं सांगितलं की, ज्यांच्याकडे सर्वात जास्त कॉईन्स आहेत त्या कोणत्याही स्पर्धक ते कॉइंस वापरुन एखादा लक्झरी पदार्थ विकत घेऊ शकतो. ही संधी मी त्यांच्यासाठी उपलब्ध करुन देतोय. यावर सगळेजण सूरजकडे सगळ्यात जास्त कॉइंस असल्याचे सांगतात आणि सूरजला त्या पदार्थांपैकी एखादा पदार्थ हवा असेल तर तो विकत घेऊ शकतो, असं सांगतात. समोर आलेल्या टीव्हीवर केक, बिर्याणी आणि पिझ्झा असे तीन पदार्थ असतात आणि यातील पदार्थांपैकी एखादा पदार्थ सूरज विकत घेऊ शकतो. मात्र सूरज यापैकी कोणताही पदार्थ विकत घेण्यास स्पष्ट असा नकार देतो.
सूरजने नकार का दिलाय याचं कारण पॅडी दादा विचारतात तेव्हा सूरज सांगतो, “मी खूप साधा माणूस आहे. मला या कोणत्याच गोष्टींची आवड नाही. हा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असेल तर मी एखाद वेळेस विचार करेल”. सूरजच्या या उत्तराने संपूर्ण महाराष्ट्राला त्याने आपलंस केलं. त्यानंतर सूरज असेही म्हणताना दिसला आहे की, “माझा चाहता वर्ग इतका मोठा आहे की ते माझ्यासमोर असे पदार्थ आणून ठेवतात आणि खायला सांगतात पण मी त्यातला एकही पदार्थ खात नाही कारण भाकरी आणि कालवण हेच माझं अन्न आहे”. सूरजने दिलेलं हे उत्तर साऱ्यांच्याच पसंतीस पडलं असून सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय.