Arya Jadhao Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मधील अनेक स्पर्धक चर्चेत आलेले पाहायला मिळाले. यंदाच्या या पर्वातील सर्वच स्पर्धकांनी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. यंदाच्या पर्वातील रॅप स्टार आर्या जाधव हिने हे पर्व विशेष गाजवलं. यंदाच्या या पर्वात आर्या व निक्की तांबोळीमधील वाद टोकाचा ठरला. आर्याने निक्कीला शोमध्येच कानाखाली मारण्याची घटना घडली होती. यामुळे या दोघींमधला वाद टोकाला जाऊन निक्कीने आर्याला ताबडतोब घराबाहेर काढण्याची विनंती ‘बिग बॉस’च्या टीमला केली होती. आणि होस्ट रितेश देशमुख यांनी आर्याला भाऊच्या धक्क्यावर बाहेर काढलं.
Bigg Boss ने घराबाहेर काढल्यानंतर आर्याला नेटकऱ्यांकडून भरभरुन पाठिंबा मिळाला. या प्रेमामुळे आर्या सुद्धा भारावून गेली. त्यानंतर आर्या पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. भन्नाट रॅप बनवून आर्या चर्चेचा विषय ठरली. एका नव्या रॅपच्या माध्यमातून आर्याने पुन्हा एकदा निक्कीला सणसणीत टोला लगावला. आर्याने टोला लागवताच निक्कीच्या फॅन पेजने तिला डिवचलं. तर निक्कीनेही तिच्या फॅन पेजला पाठिंबा दर्शवित ती पोस्ट एक मोठा हाथी या गाण्यासह स्टोरीला पोस्ट केली.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली विवाहबंधनात, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर
निक्कीने “एक मोटा हाथी” हे गाणं लावत आर्याला अप्रत्यक्षपणे वाढलेल्या वजनावरून ट्रोल केलं. त्याचवेळी आर्याने तब्बल १० दिवसांत १० किलो वजन कमी करण्याचं चॅलेंज स्वतःलाच दिलं. गेले १० दिवस आर्या जीव तोडून मेहनत करताना दिसली. हे चॅलेंज तिला काही करुन पूर्ण करायचं होतं म्हणून तिने टोकाची मेहनत करत तब्बल ९ दिवसांत १० किलो वजन घटवले.
आर्याने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन याबाबतची स्टोरी पोस्ट करत माहिती दिली आहे. आर्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वजनकाट्यावर उभी राहून वजन दाखवताना दिसत आहे. आर्या हा व्हिडीओ दाखवत भावुक झाली असल्याचंही पाहायला मिळालं. आर्याने हे चॅलेंज तब्बल नऊ दिवसांत पूर्ण केलं आहे. आर्याची ही पोस्ट पाहून तिच्या अनेक चाहत्यांनी तिला काळजी घेण्याची विनंती केली आहे.