‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाचं हे पर्व १०० दिवसांचं नसून अवघ्या ७० दिवसांचं असणार आहे. यंदाच्या या पर्वात सगळेच स्पर्धक उत्तम खेळताना दिसले. या पर्वात आता शेवटचे आठ स्पर्धक उरले आहेत. शेवटच्या दिवसांत आता स्पर्धकांना ‘बिग बॉस’ यांनी खूप मोठं सरप्राइज दिलं आहे. स्पर्धकांना भेटायला ‘बिग बॉस’च्या घरात त्याचे कुटुंबीय आले आहेत. काही वेळापूर्वीच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीतला भेटायला त्याची बायको व मुली आल्या होत्या. (Bigg Boss Marathi Season 5)
त्यानंतर आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये आणखी एका सदस्याला ‘बिग बॉस’ने सरप्राइज दिलं आहे. वडिलांनी कौतुक केलं नाही अशी खंत व्यक्त केलेल्या धनंजय पोवारचे आई-वडील व बायको ‘बिग बॉस’च्या घरात त्याला भेटायला आले आहेत. यापूर्वी सोशल मीडियावरुनही त्याच्या कुटुंबीयांनी त्याला भरभरुन पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला. आता दोन महिन्यांनी लेकाला भेटायला आई-वडील आले आहेत. त्यांची भेट पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले.
‘बिग बॉस मराठी’च्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ असं म्हणत आहेत की, “एका सदस्याचे स्वप्न होतं की वडिलांनी आपलं कौतुक करावं. आणि आज तो दिवस आला आहे”. असं म्हणत ते सदस्यांना फ्रिज करतात. त्यानंतर ‘बिग बॉस’चा दरवाजा उघडतो आणि त्यातून धनंजय पोवारचे वडील आत येतात. आत येऊन ते धनंजयला मिठी मारतात. त्यावेळी फ्रिज केलेल्या धनंजयला अश्रू अनावर होतात. त्याला ‘बिग बॉस’ यांनी रिलीफ केल्यानंतर तो उठून आधी वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो.
त्यानंतर तो वडिलांना घेऊन बेडरुममध्ये जातो आणि वडिलांना बसवून त्यांचे पाय चेपत त्यांची सेवा करताना दिसतोय. हे पाहून त्याचे वडील म्हणतात, “याच्यापेक्षा काहीच सुख नाही”. त्यानंतर धनंजयला आणखी एक सरप्राइज मिळतं, आणि घरात त्याच्या बायको व आईची एंट्री होते. बायको व आईला पाहून धनंजयचा अश्रूंचा बांध फुटतो. त्यानंतर दोघी त्याच्या जवळ येत त्याला मिठी मारतात. तेव्हा धनंजयची आई, “मला तुझा अभिमान आहे”, असं म्हणतात.