Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’चा नुकताच भव्यदिव्य ग्रँड फिनाले पार पडला. यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने नाव कोरलं तर अभिजीत सावंत हा उपविजेता ठरला. तर तिसऱ्या क्रमांकावर निक्की तांबोळी बाहेर पडली. इतकंच नव्हे तर सहाव्या क्रमांकावर बाहेर पडताना जान्हवीने तब्बल नऊ लाख रुपये रक्कम घेतली आणि ती घराबाहेर पडली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून चौथ्या क्रमांकावर धनंजय पोवार एलिमिनेट झाला. त्याच्या एव्हिक्शननंतर डीपीचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून धनंजयला भरभरुन वोटिंग करण्यात येत होतं.
नुकतीच धनंजयने ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी धनंजयला “टॉप ६ मध्ये असताना रितेश सरांनी एक ऑफर दिली होती की, इतकी रक्कम आहे ती घेऊन तुम्ही घराबाहेर जाऊ शकता. जान्हवीने ती रक्कम घेतली आणि ती घराबाहेर आली त्यासाठी तिचं कौतुकही झालं. त्यानंतर अंकिता व तुम्ही बाहेर पडलात, तर तुम्हाला असं कुठेतरी वाटतंय की, जान्हवीने जे पाऊल उचललं ते तुम्ही उचललं असतं तर योग्य झालं असतं का?”, असा प्रश्न विचारला.
आणखी वाचा – “मला ट्रॉफी हवी होती कारण…”, अभिजीत सावंतचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “सूरजसाठी खुश आहे पण…”
या प्रश्नाचं उत्तर देत डीपी म्हणाला, “अजिबात नाही. तिथे ९० लाख असते तरी उचलले नसते. कारण आम्हाला तिथे स्वतःची पात्रता सिद्ध करण्याची संधी मिळाली होती. मी कोणत्याही क्रमांकावर आउट झालो असतो तरी मला माहित होतं की आपण विजेता होऊ शकत नाही. कारण वोटिंग वेगळ्या पद्धतीने सुरु आहे, लोकांचं प्रेम वेगळ्या पद्धतीने मिळतंय. पण आपण स्वतःला कुठे पाहतोय, आपण स्वतःला कुठे डिझर्व करतोय हे ज्या लोकांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांना दाखवलं पाहिजे. आर्थिक प्रश्न हा प्रत्येकाचा असतो पण प्रत्येकवेळी तो सुटेल असं नाही. काहीवेळा स्वतःला शिकवावं लागतं, म्हणून मी पैसे घेतले नाहीत. मी अंकिताला हेसुद्धा म्हणालो की, १५ लाख जरी असते तरी ते मी घेतले नसते. कारण आपण ज्या भागातून आलो आहोत त्यासाठी या गोष्टी विचित्र आहेत”.
पुढे तो म्हणाला, “असं केलं असतं तर कधीही लोकांनी आम्हाला स्वीकारलं नसतं. पैशासाठी मी आजपर्यंत कोणतीच गोष्ट केली नाही. आणि या शोमध्येही मी पैशासाठी आलो नव्हतो. रक्कम कमी मिळाली याचं मला दुःख नाही. माझं घर, माझे आई-वडील, कुटुंब यांच्यासाठी मी आहे तसाच आहे. मला खरंच असं वाटतं नाही की, ती प्राइज मनी मी घ्यायला हवी होती”.