‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला अगदी धमाकेदार सुरवात झाली असून पहिल्या दिवशीपासून घरात भांडणं सुरु झाली आहेत. घरात आल्यापासून निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडणं होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात दुसऱ्या दिवशीही निक्की व वर्षा यांच्यात भांडणं झाली. यात ते दोघे किचन परिसरात बोलत असताना निक्की वर्षा यांना “तुमच्याकडे पॉवर कार्ड असल्यामुळे तुम्ही जेवण बनवू शकत नाही. पण तुम्ही तुमच्या स्वत:साठीचं जेवण स्वत:चं बनवा. मी काल तुमच्यासाठी आदर म्हणून आणि मला जेवण बनवायला आवडतं म्हणून मी केलं. पण आज तुम्ही तुमचं जेवण बनवा”.
यापुढे वर्षा निक्कीला “मला काहीही करायचं नाही असं ‘बिग बॉस’ने सांगितलं आहे. फक्त बसून खायचं आहे असं सांगण्यात आलं आहे”. म्हटलं. यावर निक्की त्यांना “बसून खायचं हे असं कुठेही लिहिलेलं नाही” म्हणते. यावर वर्षाताई निक्कीला “कुठे लिहिलेलं नाही. पण ‘बिग बॉस’ने मला नुसतं बसून खायला सांगितलं आहे” असं म्हटलं. यावर निक्की त्यांना असं म्हणते की, “नुसतं बसून कसं खायचं. तुम्ही आंघोळ स्वत: करता, केस स्वत:चे विंचरता. मग तुमचं जेवणही तुम्हीच करा”.
आणखी वाचा – Video : परदेशात भारतीय संस्कृती व परंपरांचे दर्शन, आदेश बांदेकर भारावले, व्हिडीओ व्हायरल
मग निक्की “मी आदर म्हणून तुमच्यासाठी जेवण केलं पण आजपासून तुम्ही तुमचं जेवण करा” असं म्हणते. यावर वर्षाताई निक्कीला “तू हे काल म्हणायला हवं होतंस”.तर यावर निक्की त्यांना असं म्हणते की, “मला काल नाही जमलं पण आज आठवलं म्हणून मी हे बोलत आहे. इथे सर्वांची मतं सारखी नसतात, ती बदलत असतात.” यावर वर्षा ताई निक्कीला “तू खूप चंचल आहेस. माझ्यावर अशी ओरडू नकोस. मी तुला शांतपणे सांगत आहे. तुझं व्यक्तिमत्व ओळखण्याची माझ्या मनाची तयारी झाली आहे” असं म्हणतात.
यापुढे “तुमचा शांत बोलण्याचा जसा स्वभाव आहे. तसंच माझं असं बोलण्याचा स्वभाव आहे” असं निक्की वर्षाताईंना म्हणते. यावर वर्षाताईही निक्कीला उपहासात्मक पद्धतीने “ओके धन्यवाद” म्हणतात आणि तिथून निघून जातात. दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये आल्याच्या पहिल्या दिवसापासूनचं निक्की व वर्षा यांच्यात वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता हे वाद किती विकोपाला जाणार हे आगामी भागांतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.