गेल्या काही वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार राजकारणाकडे वळली आहे. यातील काही कलाकार मंडळी आधीपासून राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे, तर काही मंडळी नव्याने येत आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे, जिने काही महिन्यांपूर्वी राजकारणाकडे वळली आहे. ती म्हणजे अभिनेत्री मेघा धाडे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती असलेली मेघा धाडेने काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता मेघाला पक्षाकडून एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (Bigg Boss Marathi fame Megha Dhade)
अभिनेत्री मेघा धाडेने जूनमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पक्षप्रवेशाच्या अवघ्या काही महिन्यातच पक्षाने तिची एका महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. मेघा धाडेची भाजपच्या प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कलाकारांच्या पक्षप्रवेशावेळी चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते मेघाला नियुक्तीपत्र देण्यात आले.
मेघाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेता अभिजीत केळकर व अन्य मंडळी उपस्थित होती. या पोस्टमध्ये मेघ धाडे म्हणाली, “आज माझी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, सांस्कृतिक प्रकोष्ठची प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले. मला प्रिया ताईंनी जी जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करीन. हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार….”
हे देखील वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखचं असंख्य बहिणींबरोबर रक्षाबंधन, म्हणाला, “मी समाधानाने…”
दरम्यान, अभिनेता अभिजीत केळकर यानेही याच कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला होता. अमोल कोल्हे, आदेश बांदेकर, दीपाली सय्यद, प्रिया बेर्डे यांसारखे मराठी कलाकार राजकारणात स्थिरावले आहेत. तर सौरभ गोखले, प्रभाकर मोरे, हार्दिक जोशी, सुशांत शेलार, अदिती सारंगदार यांसारख्या अनेक कलाकारांनी विविध राजकीय पक्षात नुकताच प्रवेश केला आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपामध्ये प्रवेश, म्हणाला, “किती काळ काठावर उभं राहून…”
अभिनेत्री मेघा धाडेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तिला खरी ओळख मिळाली, ती ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमधून. मेघाने या शोचे विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून मनोरंजन सृष्टी गाजवल्यानंतर मेघाची राजकीय क्षेत्रातील वाटचाल कशी असणार आहे, हे पाहावं लागेल. (Bigg Boss Marathi fame Megha Dhade)