Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : ‘बिग बॉस ४’ची मराठमोळी लाडकी जोडी म्हणजेच अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे अखेर बोहोल्यावर चढले आहेत. मोठ्या थाटामाटात त्यांचा शाही विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला आहे. काही दिवसांपासून अमृता-प्रसादच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या चर्चांना पूर्णविराम देत ही मराठमोळी जोडी लग्नबंधनात अडकली आहे. आज शनिवार (१८ नोव्हेंबर) रोजी प्रसाद-अमृता यांनी सप्तपदी घेतली आहे. तळेगाव, पुणे येथील एका फार्महाऊसवर त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.
प्रसाद-अमृताच्या शाही लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी व कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा हा शाही विवाहसमारंभ पार पडला आहे. अमृता-प्रसाद यांच्या लग्नाचा लूक समोर आला आहे. त्यांच्या या लूकवरून नजर हटेनाशी झाली आहे. सप्तपदी घेतानाचा नव्या नवरा-नवरीचा फोटो समोर आला आहे आणि या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रसाद-अमृताने अखेर सप्तपदी घेत लगीनगाठ बांधली आहे. सप्तपदी घेताना मुंडवळ्या घालून सजलेल्या नवरा-नवरीचा लूक लक्षवेधी ठरत आहे. गुलाबी रंगाच्या डिझाइनर साडीत नव्या नवरीचं सौंदर्य खुलून आलं आहे. तर पिवळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये नवरा मुलगा सप्तपदी घ्यायला सज्ज झाला आहे. सप्तपदी घेताना प्रसादने अमृताला अलगद असं जवळ घेत सप्तपदीची विधी पूर्ण केली. इतकंच नव्हे तर सप्तपदी घेताना प्रसादने अमृताची साडीही अलगद पकडलेली पाहायला मिळत आहे. त्याच्या या कृतीने प्रसादचं विशेष कौतुक केलं जात आहे. यावरून दोघांमधील प्रेमाची प्रचिती येत आहे.
प्रसाद-अमृताचा लग्नाचा लूक पाहता ही जोडी नजर लागण्याइतकी सुंदर व लक्षवेधी दिसत आहे. अमृता-प्रसादने सोशल मीडियावर त्यांच्या मेहंदी, हळदी कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांच्या संगीत सोहळ्यातील धमाल-मस्तीचे अनेक व्हिडीओही चांगलेच व्हायरल झाले होते. याशिवाय प्रसाद-अमृताच्या लग्नात कलाकार मंडळी धमाल करतानाचे अनेक फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.