भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांनी नुकतीच विभक्त होत असल्याची घोषणा केली. दोघांमधील घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या आणि अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. तसंच हार्दिक व नताशा यांच्या नात्याला पूर्णविरामदेखील लागला आहे. गेले अनेक दिवस हार्दिक व नताशा यांच्यात काही आलबेल नसल्याचे दिसून येत होते. दोघांच्या नात्यात दरी निर्माण झाली होती. त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियासह इतर सर्व प्रसार माध्यमांमध्ये अनेक चर्चा होत होत्या. मात्र या दोघांनी त्याबद्दल अधिकृतपणे भाष्य केलं नव्हतं. मात्र आता त्यांनी यावर स्पष्टपणे सांगितले आहे.
नताशाने सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे फोटो हटवल्यापासूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला होता. मात्र, याबाबत दोघांकडूनही अधिकृत घोषणा झाली नव्हती. अखेर हार्दिक व नताशाने काल (गुरुवार, १८ जुलै) संध्याकाळी एकमेकांपासून विभक्त होत असल्याची पोस्ट शेअर केली. आम्ही ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे हार्दिकने म्हटले आहे. हार्दिक व नताशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे याबद्दल सांगितले
हार्दिकने त्याच्या या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले व आमचे सर्वस्व दिले आणि आम्हाला विश्वास आहे की, हे आम्हा दोघांच्याही हिताचे आहे. आम्ही एकत्र अनुभवत असलेला आनंद, परस्पर आदर आणि सहकार्य लक्षात घेऊन तसेच आम्ही एक कुटुंब म्हणून वाढत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. अगस्त्यमुळे आमच्या आयुष्यात भरभराट आली”.
आणखी वाचा – शुक्रवारी ‘या’ राशीच्या लोकांचे आयुष्य उजळणार, नोकरी व व्यवसायात आहेत लाभाच्या संधी, जाणून घ्या…
यापुढे त्याने असं म्हटलं की, “आम्ही त्याला जगातील सर्व सुख देण्याचा प्रयत्न करु. तो आमच्या जीवनाचा आधार असेल. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्यामुळे या कठीण व संवेदनशील काळात आम्हाला गोपनीयता देण्यासाठी आम्ही तुमच्या समर्थनाची व आम्हाला समजून घेण्याची मनापासून विनंती करतो”.
दरम्यान, नताशा एका नाईट क्लबमध्ये हार्दिकला भेटली होती. यानंतर दोघांचे नाते काही वेळातच घट्ट झाले. दोघांनी ३१ मे २०२० रोजी त्यांच्या नात्याचा खुलासा केला. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं ३० जुलै २०२० रोजी अगस्त्य नावाच्या मुलाला जन्म दिला. नंतर १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उदयपूर येथे हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचे लग्न झाले होते.