Nana Patekar Angry : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या ठसठशीत अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे नाना पाटेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या शिस्तप्रिय स्वभावासाठी, स्पष्टवक्तेपणासाठी आणि वेळेच्या काटेकोरपणासाठी ओळखले जाणारे नाना यावेळी कोणत्याही विधानामुळे नाही, तर एका चित्रपटाच्या कार्यक्रमातून अचानक बाहेर पडल्यामुळे चर्चेत आले आहेत. नानांचा आगामी चित्रपट ‘ओ रोमिओ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी मुंबईत आज दुपारी १२ वाजता एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विशेष म्हणजे नाना पाटेकर नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाला अगदी वेळेवर पोहोचले होते. त्यांनी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्यासोबत माध्यमांसाठी फोटोसेशनही केलं. मात्र ठरलेल्या वेळेला कार्यक्रम सुरू झाला नाही. बराच वेळ लोटल्यानंतर स्टेजवर कलाकारांना बोलावण्यात येत असतानाच एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली. नाना पाटेकर कार्यक्रमस्थळी उपस्थितच नव्हते. कारण, ते तोपर्यंत कार्यक्रमातून निघून गेले होते.यामागचं कारण म्हणजे सहकलाकार शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा तब्बल दीड तास उशीर. जिथे नाना वेळेवर उपस्थित होते, तिथे प्रमुख कलाकार उशिरा पोहोचल्यामुळे कार्यक्रम लांबणीवर पडला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अखेर नानांनी कार्यक्रमस्थळ सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “नाना निघून गेले असले तरी मला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. नाना म्हणजे वर्गातला सगळ्यात खोडकर मुलगा, जो थोडं छळतो, पण सगळ्यांचं मनोरंजनही करतो. मी त्यांना गेली २७ वर्षे ओळखतो, मात्र पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करत आहोत. आम्ही त्यांना जवळपास तासभर वाट पाहायला लावलं आणि शेवटी ते निघून गेले.” दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नानांच्या भूमिकेचं जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ज्येष्ठ कलाकाराला इतका वेळ थांबवणं अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. “नानांनी जे केलं ते योग्यच,” “वेळेची किंमत सगळ्यांनीच ठेवायला हवी,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.



