bigg boss marathi 6 : सोशल मीडियावर ‘काळू डॉन’ म्हणून लोकप्रिय असणारा प्रभू शेळकेची ‘बिग बॉस मराठी’ सिझन सहामध्ये एंट्री झाली. पण पहिल्याच दिवशी काळू डॉनला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. हिंदी मालिका आणि रिऍलिटी शोमधून लोकप्रिय झालेला विशाल कोटियन यासाठी कारणीभूत ठरला. प्रभूने यावेळी त्याच्या आजारपणाविषयीही भाष्य केले जे ऐकून अनेकांना धक्का बसला. तर विशालने खिल्ली उडवल्याचं त्यालाही दुःख झालं आणि पुन्हा असं करणार नाही म्हणत त्याने काळू डॉनची माफी मागितली आणि मैत्रीचा हात पुढे केला.
‘बिग बॉस’च्या घरात एकमेकांची ओळख करत असताना विशालने ‘काळू डॉन’ला उचलून घेतलं आणि म्हणाला, “घरात डंबल कमी पडले तर हा आहे”. यावर डॉन म्हणतो, “नाही रे बाबा… मी डंबल वगैरे नाही. तुम्हाला आताच सांगून ठेवतो, माझ्याबरोबर अशी चेष्टा यापुढे करु नका. मी आजारी आहे आणि महिन्याला माझं रक्त बदलावं लागतं. माझा हातही मोडलेला आहे. म्हणून तुम्हाला मी हे आधीच सांगून ठेवतो”. काळू डॉनच ऐकून विशाल त्याला म्हणतो, “तू असशील डॉन… मी सुद्धा दगडी चाळीतला मुलगा आहे”. यानंतर काळू डॉन एकटाच वॉशरुममध्ये जातो आणि रडू लागतो.
‘काळू डॉन’ त्याच्या देवीआईची प्रार्थना करत म्हणतो, “माझी देवीआई प्लीज मला साथ दे. मला माहितीये तू माझ्या नेहमी पाठिशी राहणार आहेस. तू माझी माय आहेस. दर महिन्याला रक्त बदलावं लागतं… हा आजार बरा करण्यासाठी मी इथे आलोय. माझ्या मित्रांनो! तुमचा काळू डॉन तुमच्यासाठी इथे आलाय. प्लीज मला साथ द्या”. विशालला अन्य सदस्यांकडून काळू डॉनच्या आजारपणाविषयी कळताच तो त्याची माफी मागतो.
आणखी वाचा – “पहिला कोंबडा भेटला”, काळू डॉन जमिनीवरच झोपला आणि कोंबडा आरवताच…; यावर सागर कारंडेने असं केलं की…
शिवाय एपिसोडच्या शेवटी प्रभू त्याच्या आजारपणाविषयीही भाष्य करतो. तो म्हणतो, “दर महिन्याला माझं रक्त बदललं जातं. गेल्या आठ वर्षापासून मला हा आजार आहे. या आजाराचं नाव आहे यॅलेसेमिया. या आजारात शरीरातील रक्तपेशी नष्ट होत असतात. त्यामुळे दर महिन्याला मला रक्त बदलावं लागतं”. याशिवाय राधा पाटीलशी बोलताना काळू डॉन म्हणाला, “मी पत्र्याच्या घरात राहतो… अशा घराची मला सवय नाहीये, पण, एक गोष्ट नक्की सांगतो मला स्वच्छता लागते. सगळं टापटीप असलं पाहिजे”.





