Suraj Chavan On His Movie : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चे विजेतेपद रील स्टार सूरज चव्हाणने पटकावले. यानंतर सूरज सर्वत्र बराच चर्चेत राहिला. सर्वत्र सूरजचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळालं. सध्या सर्वत्र सूरजची चर्चा सुरु असताना त्याचा ‘राजा राणी’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. १८ ऑक्टोबरला सूरजचा ‘राजा राणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला हवा तसा प्रेक्षकांचा पाठिंबा मिळालेला पाहायला मिळाला नाही. यामुळे चित्रपटाची टीम काहीशी नाराज असलेली दिसली. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने चित्रपटावर अन्याय होतोय, असं म्हणत सूरजने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सूरजच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सूरजने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो ‘राजा राणी’ चित्रपटाच्या टीमबरोबर दिसत आहे. यावेळी सूरज असं बोलताना दिसत आहे की, “नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आमच्या ‘राजा राणी’ चित्रपटावर अन्याय होतोय. त्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. थिएटरमध्ये जा, पिक्चर बघा आणि सपोर्ट करा”, असं म्हणत त्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. सूरजनंतर चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा रोहन पाटीलने या प्रकरणावरुन आपले मत मांडले.
आणखी वाचा – “कायम खंत राहिल की…”, सूनेची अश्विनी एकबोटेंसाठी भावुक पोस्ट, म्हणाली, “आशुआई तुला भेटले नाही पण…”
रोहन म्हणाला, “बिग बॉसनंतर सूरज पहिल्यांदाच ‘राजाराणी’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर दिसत आहे. खूप चांगला सिनेमा बनला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही लोकांकडून असे म्हटले जात आहे की, हा सिनेमा बंद करण्यात यावा, बॅन करावा. गरीब पोरं जर मोठी होत असतील किंवा संघर्षाला यश मिळत असेल तर काही लोकांना खपत नाही, असं म्हटलं जातं. तर महाराष्ट्राच्या जनतेला मला हे सांगायचं आहे की, काही लोकं जरी म्हणत असली की हा सिनेमा बंद करा, तरी हा सिनेमा मोठ्या ताकदीनं सुरू राहील.
पुढे तो म्हणाला, “आमच्यावर कितीही अन्याय झाला तरी महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे की ते या सिनेमाला भरभरून प्रतिसाद देतील, प्रेम करतील. जसा सूरजला बिग बॉसमध्ये पाठिंबा दिला, तसाच या चित्रपटालासुद्धा पाठिंबा देतील”, असं म्हटलं आहे. सूरजने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.