सध्या ‘बिग बॉस मराठी ५’च्या स्पर्धकांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ५व्या पर्वाचे विजेतेपद पटकावल्यानंतर सूरज चव्हाण सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर सूरजची आधी हवा होतीच मात्र ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर त्याची सोशल मीडियावरील क्रेझ आणखीणच वाढली आहे. ‘बिग बॉस’चे अनेक स्पर्धक सूरज चव्हाणची भेट घेण्यासाठी त्याच्या गावी जात आहेत. त्या सगळ्यांबरोबरचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. मात्र सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्रामवरून त्याचे काही फोटो डिलीट झाले आहेत. सूरज चव्हाणने स्वतः ही माहिती दिली आहे. (Suraj Chavan Apology)
सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या काही महत्त्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. सूरजने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. डिलीट झालेल्या पोस्टमध्ये अंकिता वालावलकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्याबरोबरच्याही काही पोस्ट असल्याचे सूरजने सांगितले आहे. सूरजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “नमस्कार मी आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका सुरज चव्हाण. माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटचा काही प्रॉब्लेम झाला असल्यामुळे काही खूप महत्त्वाच्या पोस्ट्स डिलीट झाल्या आहेत. त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण पोस्ट होत्या. यापुढे मी स्वतः लक्ष देईल आणि काळजी घेईल. तरीही आपणा कुणाचे मन दुखावले असतील तर मोठ्या मनाने मला माफ करा”
दिवाळीनिमित्त ‘बिग बॉस’च्या घरातील धनंजय पोवार, वैभव चव्हाण, इरिना, जान्हवी किल्लेकर, ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर यांनी सूरजची भेट घेतली होती. याचे काही फोटो व व्हिडीओ सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आले होते. जान्हवीने सूरजच्या गावी जात ट्रॅक्टर चालवला होता, तसंच ती त्याच्या शेतातही गेली होती, अंकितानेदेखील त्याच्या कुटुंबियांसह शेतात जेवण केले होते. त्याचाबरोबर डीपी, वैभव व इरीना यांनीही सूरजबरोबरचे फोटो पोस्ट केले होते. मात्र आता ही फोटो व व्हिडीओ सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिसत नाहीयेत.
सूरज अशिक्षित असल्यामुळे त्याला सोशल मीडियाचे फारसे ज्ञान नाही. त्यामुळे त्याचे सोशल मीडिया अकाऊंट त्याचे काही जवळचे मित्र सांभाळतात. त्यामुळे आता या सर्व पोस्ट डिलीट कशा झाल्या याचे कारण अद्याप कळलेलं नाही. पण सूरजकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान, सूरजच्या सोशल मीडियाद्वारे याआधीही अशी फसवणुकीची घटना घडली होती. त्याच्या नावाने काही जणांनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरदेखील सूरजने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.