गेल्या काही दिवसांत ‘बिग बॉस मराठी ५’ च्या स्पर्धकांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या. डीपी दादांच्या घरी इरिना व वैभव गेले होते. त्यानंतर हे तिघे सूरजच्या गावी गेले होते. मग जान्हवी किल्लेकरने सूरज चव्हाणला दिलेला शब्द पाळत भाऊबीजनिमित्त सूरजच्या गावी जात त्याची भेट घेतली होती. अशातच नुकतीच ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरनेदेखील सूरजच्या गावी जात त्याची भेट घेतली होती. या सर्व भेटीचे काही खास क्षण सूरज व जान्हवी, अंकिता, डीपी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आले होते. (Ankita Walawalkar angry with Suraj Chavan)
मात्र आता सूरजच्या इन्स्टाग्राम अकाउंटदवरुन या सर्व पोस्ट डिलीट झाल्या आहेत. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सूरजच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट डिलीट झाल्यामुळे अनेकांनी यावर प्रश्नचिन्हे उपस्थित केलं आहे. यासंदर्भात अंकिता वालावलकर हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये काही नेटकरी सूरजच्या या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. अंकिताने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, “सूरजने १२ तासांच्या आत त्याच्या अकाउंटवरुन अंकिताच्या पोस्ट का डिलीट केल्या?”
तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “आधी फक्त अंकिताचे फोन उचलत नव्हता तोपर्यंत ठीक होतं. पण आता तर पोस्ट डिलीट केल्या”. यावर अंकिताने स्पष्टीकरण देत असं म्हटलं आहे की, “धन्यवाद, लक्षात घेतल्याबद्दल… पण मी एक सांगते, सूरजचं अकाउंट सूरज स्वतः हँडल करत नाही. त्याच्या आजूबाजूला मी नको असल्यामुळे मी आता यातून काढता पाय घेत आहे”
यापुढे अंकिताने “यापुढे आता माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात” असं म्हटलं आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात सूरज व अंकिता यांच्यात भावा-बहिणीचे नाते पाहायला मिळाले होतं. तेच नाते त्यांनी ‘बिग बॉस’च्या घराबाहेरही जपलं. याचा प्रत्यय सोशल मीडिया पोस्टद्वारे आला होता. मात्र आता सूरजच्या अकाउंटवरुन त्याच्या अंकिताबरोबरच्या पोस्ट डिलीट करण्यात आल्यामुळे अंकिता काहीशी नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे.