‘बिग बॉस’चे घर म्हटलं की, अनेक कलाकार शंभर दिवस घरात राहण्यासाठी आपल्या कुटुंबापासून आपल्या घरापासून दूर राहण्याचा निर्णय घेतात. हा खेळ खेळण्यासाठी, ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी ही कलाकार मंडळी तब्बल १०० दिवस मनावर दगड ठेवून इतर स्पर्धकांसह राहत असतात. बरेचदा चित्रीकरणासाठी ही या कलाकार मंडळींना घरापासून दूर राहावं लागतं तेव्हाही यांना घराची आठवण सतावत असते. तर ‘बिग बॉस’च्या घरात शंभर दिवस राहण्यासाठी मनाची तयारी करुन हे कलाकार गेलेले असतात. तरीसुद्धा त्यांना घराची, त्यांच्या माणसांची आठवण आल्यापासून राहत नाही. (Bigg Boss Marathi 5 Updates)
‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक हे एका कुटुंबासारखे राहत असले तरी आपली माणसं ती आपलीच माणसं असतात त्यामुळे बरेचदा हे स्पर्धक त्यांच्या आठवणीत भावुक होताना पाहायला मिळतात. अशातच यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री योगिता चव्हाणला तिच्या घराची आठवण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व स्पर्धकांना जमिनीवर झोपण्याची शिक्षा सुनावलेली असते सगळेजण झोपायला जात असतात त्यावेळेला योगिताला रडू अनावर होतं. ती का रडत आहे असं म्हणत सगळे स्पर्धक तिच्याभोवती जमा होतात. तेव्हा आर्या तिला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा सगळेजण म्हणतात की, तिला तिच्या नवऱ्याची आठवण येत आहे. यावर धनंजय असं म्हणतो की, “काय सारखं अहो, अहो करायचं. मस्त राहायचं”. तर अंकिता म्हणते की, “या घरातला पहिला रडण्याचा मान योगिताने पटकावला आहे”.
तर इतर स्पर्धक सांगतात की, “तू काही काळजी करु नको. तू खूप स्ट्रॉंग आहेस”. त्यानंतर योगिताला ते कॅमेरासमोर घेऊन येतात त्यावेळेला आर्या, जान्हवी, पॅडी सगळेजण तिथे असतात. जान्हवी सौरभच नाव घेत, “सौरभ तू काळजी करु नकोस. आम्ही योगिताची काळजी घेऊ”, असं सांगते. तर पॅडी ही सौरभला “योगिता खूप स्ट्रॉंग मुलगी आहे. ती हा खेळ नक्की खेळेल. तू काहीच काळजी करु नकोस. आम्ही सर्व इथे आहोत”, असं सांगत तिची समजूत काढतो. तर योगिताही “मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मी खेळणार आहे”, असं म्हणत स्वतःलाच धीर देताना दिसते.

काही महिन्यांपूर्वीच योगिता व सौरभ ही जोडी लग्नबंधनात अडकली. ३ मार्च रोजी योगिता व सौरभ यांनी शाही थाटामाटात विवाह सोहळा उरकला. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून सौरभ व योगिता ही जोडी घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे दोघांना विशेष लोकप्रियता मिळाली. योगिताच्या अकाउंटवरुन ‘बिग बॉस’च्या एण्ट्रीदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. याखाली तिच्या नवऱ्याने म्हणजेच सौरभने कमेंट करत “तू खूप भारी आहेस”, असं म्हणत सपोर्ट केला आहे.