Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पर्वातील सर्वच स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या पर्वात रील स्टारला विशेष प्राधान्य मिळालं. टिक टॉक स्टार सूरज चव्हाणचा ‘बिग बॉस’च्या घरातील येण्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. यावेळी सूरज चव्हाणला घरात पाहून साऱ्यांना धक्का बसला. सुरुवातीला हा मुलगा काय इथे का आला आहे?, तो नीट खेळेल का? हा विचार करुन घरातील स्पर्धकांनीही त्याला दुय्यम दर्जा दिला. मात्र नंतर सूरजचा खेळ पाहून साऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. तर संपूर्ण महाराष्ट्रातूनही सूरजला भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर सूरजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र त्याला भरभरून वोट करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर भाऊच्या धक्क्यावरही सूरजचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. सूरजला ‘बिग बॉस’चा गेम कळायला उशीर झाला असला तरी तो माणसं ओळखायला कुठेही कमी पडलेला नाही आणि त्याची हीच गोष्ट साऱ्यांना भावली. त्याच्या साध्या भोळ्या स्वभावामुळे तो साऱ्यांच्या पसंतीस पडला. सर्वत्र सूरजचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली वीक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूरजचे कुटुंबीय त्याला भेटायला आले आहेत. सूरजचे आई-वडील त्याला लहानपणीच सोडून गेले. त्यामुळे सूरजचा सांभाळ त्याच्या आत्या व बहिणींनी केला. आता सूरजला भेटायला ‘बिग बॉस’च्या घरात त्याच्या बहिणी व आत्या आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना पाहून सूरजला खूप आनंद झालेला दिसला. सूरजच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. त्याच्या आत्या व बहिणीच्या स्वागतासाठी तो खूप उत्सुक होता.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : डीपीने निक्कीची हात जोडून मागितली माफी, ‘ती’ एक गोष्ट पटली नाही म्हणून…; असं काय घडलेलं?
घरात एंट्री करताच एका कोपऱ्यात चपला काढल्या आणि मग त्या घरात गेल्या. त्यांची ही कृती अतिशय भावुक करणारी होती. त्यानंतर त्यांनी सूरजला घट्ट अशी मिठी मारली. भावाला पाहून बहिणींना रडू अनावर झालं तर आत्याही त्याचे मुके घेत रडताना दिसली. यावेळी सूरज मात्र खूप खुश दिसला. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणतात की, “सूरज आपण स्वागत करुया आपल्या बहिणीचं आणि आपल्या आत्याचं”. त्यानंतर त्याच्या बहिणी सूरजला म्हणतात, “तुझ्यामुळे आज इथपर्यंत आपल्याला यायला मिळालं”.