Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत होता. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने एन्ट्री घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, हळूहळू त्याचा स्वभाव बघून त्याने चाहत्यांच्या मनात आपलं घर केलं आणि मग त्याला चाहत्यांचा पाठिंबा मिळू लागला. रीलस्टार म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या सूरजला त्याच्या आयुष्यात मात्र अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. लहानपणीच डोक्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या सूरजला त्याच्या बहिणींनी मोठं केलं. ‘बिग बॉस’च्या घरातही सूरज आई-वडिलांबाबत बोलताना भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच त्याने या शोचे विजेतेपदही पटकावले. यानंतर त्याला ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य भेटण्यासाठी आले होते. यापैकी पुरषोत्तमदादा पाटील यांनीही सूरजच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
पुरुषोत्तमदादा यांनी शोच्या पहिल्याच आठवड्यात घरातून निरोप घेतला होता. पण आठवड्याभरातही त्यांनी सर्वांची मनं जिंकली होती. सूरज व त्यांचा खास बॉण्ड तयार झाला होता आणि हे एपिसोडमध्येही पाहायला मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी पुरुषोत्तमदादा पाटील यांनी सूरजच्या गावी कीर्तनही केले होते आणि याचे काही खास क्षण त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. अशातच सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकताच पुन्हा एकदा भेट घेतली. यावेळी जाहीरसभा या युट्यूब वाहिनीने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पुरुषोत्तमदादा यांनी सूरजच्या वागणुकीचे कौतुक केलं आहे.
‘बिग बॉस’च्या घरात मांसाहारी जेवणाची भांडी घासण्याची पुरुषोत्तमदादा पाटील यांची ड्यूटी सूरजने केली आहे. याबद्दल सूरज असं म्हणाला की, “सर्वांनी मांसाहारी जेवण केलं होतं आणि तेव्हा पुरुषोत्तमदादा पाटील यांची भांडी घासण्याची ड्यूटी होती. तर ती ड्यूटी मी केली. कारण ते देवमाणूस आहेत. देवाचा माणूस आहेत. त्यांना मांसाहार आवडत नाही. म्हणून तेव्हा मी भांडी घासली, मी त्यांना म्हटलं की, “माऊली तुम्ही भांडे घासू नका. काहीच करु नका. सगळं मी करतो”. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून सूरजच्या या कृतीचे सर्वांनीच कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाण व गौतमी पाटीलची भेट, व्हॅनिटी व्हॅनमध्ये रंगल्या गप्पा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, सूरजच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अशा अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. “माणूस वरून किती पण काळा असावा पण मनाने सूरजसारखा निर्मळ असावा”, “म्हणून तू ‘बिग बॉस’चा विजेता झाला आहे मराठी माणसाचं मन जिंकल तू”, “सूरजसाठी एक लाईक नक्कीच”, “याला म्हणतात संस्कार”अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.