Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला सुरुवात होऊन आता महिना उलटून गेला आहे आणि हळूहळू या खेळातील रंगत आता वाढत चालली आहे. हा खेळ जितका रोमांचक होत आहे, तितकीच उत्सुकता पहायला मिळत आहे. आता सदस्यांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून दोन टीम तयार झाल्या होत्या. मात्र, आता या दोन्ही टीममध्ये फूट पडली असून निक्की विरुद्ध इतर सदस्य असा खेळ पाहायला मिळतो आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
अशातच काल ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने याच मुद्द्याला अनुसरून घरातील सदस्यांची कानउघडणी केलीच त्याचबरोबर अरबाजचा खरा चेहरासुद्धा सर्वांसमोर आणला. कलर्स मराठी वाहिनीने नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेशने सर्वांना जबरदस्त शॉक दिल्याचं दिसून येत आहे.
‘बिग बॉस’च्या नवीन प्रोमोमध्ये रितेश घरातील सदस्यांना सांगतो आहे की, “माणसं ओळखायला चुकलात की शॉक बसतो” आणि या प्रोमोमध्ये सर्वांना शॉक बसत देखील आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश सर्वांबरोबर हा खेळ खेळतो. या खेळात रितेश शॉक देणाऱ्या खुर्चीवर असणाऱ्या सदस्याला प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर सदस्याला शॉक दिला जातो. या खेळात सर्वांची तारांबळ उडालेली दिसून येत आहे आणि बहुतेक सदस्यांना शॉक बसला आहे.
आणखी वाचा – Video : अविनाश नारकरांचं सासऱ्यांवर आहे जीवापाड प्रेम, शेअर केला व्हिडीओ, म्हणाले, “ज्यांनी माझं आयुष्य…”
तसंच रितेश गंमतीने असं विचारतो की, “सूरज झापूक झुपुक हा डायलॉग किती वेळा बोलतात” आणि “निक्की दिवसातून किती वेळा लिपस्टिक लावते?” तसंच या खेळाला वैतागत थट्टेमध्ये वर्षा उसगांवकर “मला माझी शेवटची इच्छा विचारा” असं म्हणतात आणि त्यावर सगळे हसू लागतात. एकूणच आजचा भाऊचा धक्का थोडासा मजेशीर असणार आहे हे यावरुन दिसून येत आहे.
दरम्यांन, या आठडव्यात घरातील एकूण चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत व अंकिता वालावलकर हे चार सदस्य नॉमिनेट आहेत. पण यापैकी वर्षा कॅप्टन झाल्यामुळे त्या या आठवड्यात घराबाहेर जाणार नाही.