Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ च्या कालच्या भागात नुकताच कॅप्टन्सीचा अंतिम टास्क पार पडला. धनंजय, अरबाज, सूरज आणि वर्षा ताई हे सदस्य कॅप्टन्सीचे उमेदवार होते. ‘कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?’ हा कॅप्टन्सीसाठी अंतिम टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये कॅप्टन्सीच्या उमेदवारांसोबत इतर चार सदस्यांनी सहभाग घेतला असून अभिजीत आणि संग्राम यांना दुखापत झाल्यामुळे ते या टास्कमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे अभिजीत आणि संग्राम या टास्कचे संचालक होते. (Bigg Boss Marathi 5 Kapil Honrao)
पहिल्या फेरीत शून्य ग्लास विकल्याने सूरज या स्पर्धेतून बाहेर पडतो. अरबाज सर्वाधिक ४००० जंगल करन्सी जिंकतो. दुसऱ्या फेरीतही निक्की बझर वाजवते आणि अरबाजकडील पाण्याच्या ग्लासची किंमत सर्वाधिक निश्चित करते. त्या फेरीत जान्हवी-निक्की या दोघी मिळून अरबाज आणि वर्षा यांच्याकडील सर्वाधिक ग्लास विकत घेतात आणि डीपीला बाहेर काढतात आणि मग वर्षा व अरबाज यांच्यात लढत होते. यात अरबाज घरचा कॅप्टन होतो. त्यामुळे एकूणच या टास्कमध्ये निक्की व जान्हवी उत्तम खेळी खेळत अरबाजला विजयी करतात.
याच टास्कबद्दल सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेता कपिल होनरावने त्याचं मत व्यक्त केलं आहे. कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “बिग बॉसचा कालचा (शनिवारचा) भाग मी पाहिला, गेले दोन-तीन दिवस मी सतत ‘बिग बॉस’चे भाग पाहतोय. आपण निक्कीला कितीही शिव्या घातल्या किंवा आता प्रेक्षक अरबाज-निक्की यांना शिव्या घालतात, याचे कारण त्यांचा स्वभाव. त्यांचे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आवडत नाही. यामुळे रितेश भाऊंनीही त्यांची बाजू घेतली तर त्यांनाही बोललं जातं. ‘बिग बॉस’लाही बोललं जातं. पण ही गोष्ट मान्य करायला लागेल की ते खेळतात कमाल. निक्की व अरबाज यांच्या आजूबाजूला सगळा गेम फिरतो आहे”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “समस्या ही आहे की पॅडी कांबळे, अभिजीत सावंत, अंकिता आणि डीपी यांच्यात कुठे तरी एकी कमी आहे. अरबाज कॅप्टन झाला त्याठिकाणी पॅडी, अंकिता गेम पालटवू शकले असते. जर त्यांना निक्की-अरबाज यांचा प्लॅन माहीत होता. तर त्यांनी वर्षामॅमना कॅप्टन बनवायला पाहिजे होतं. वर्षा यांना कॅप्टन केलं असतं तर एक्का यांच्या हातात होता. कारण अरबाज-निक्की यांचा प्लॅन फसला असता. जे करायला पाहिजे होतं”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून संग्राम चौगुलेला घ्यावा लागला निरोप, ‘या’ कारणामुळे संपला प्रवास
दरम्यान, कॅप्टन्सी टास्कमध्ये वर्षा यांनी अरबाज, निक्की व जान्हवी यांच्याबरोबर संगनमत केलेले असते. त्यामुळे त्या ‘टीम बी’बरोबर न राहता अरबाज-निक्की यांच्याबरोबर डील करतात. वर्षा यांनी अरबाज-निक्कीची साथ दिल्याने ‘बी टीम’ ठरवते की वर्षा यांच्याकडील पाणी अजिबात खरेदी न करता त्यांना हरवायचे आणि परिणामी त्या या कॅप्टन्सी टास्कमधू बाद होतात. त्यामुळे आता सध्या त्या नॉमिनेशनच्या प्रक्रियेत आहेत.