Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या सीझनचा सहावा आठवडा आजपासून सुरू होणार आहे. घरात आता एकूण १२ स्पर्धक उरले आहेत. योगिता, निखिल, पुरुषोत्तम आणि इरिना यांच्या एक्झिटनंतर घरातील उर्वरित सदस्यांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एवढे दिवस अप्रत्यक्ष नॉमिनेशन व्हायचं. टास्क, जोड्या, पॉवर कार्ड किंवा गुहेत गुप्त नॉमिनेशन झाल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु, या सहाव्या आठवड्यात पहिल्यांदाच घरातील सदस्य एकमेकांना थेट समोरासमोर नॉमिनेट करणार आहेत.
‘बिग बॉस’ने घरातील एकूण १२ सदस्यांचे फोटो टेबलवर ठेवले आहेत. याच्या बरोबर बाजूला हिरव्या रंगाची कचरापेटी ठेवण्यात आली आहे. घरात असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या आणि नको असलेल्या सदस्यांचे फोटो फाडून कचरा पेटीत टाकण्याचा नॉमिनेशन टास्क घरातील सदस्यांना देण्यात आला आहे. यावेळी वैभव व निक्की यांच्यात चांगलीच बाचाबाची होणार आहे. या बाचाबाचीचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये निक्की वैभवला गद्दार म्हणत आहे तर वैभवदेखील तिला प्रतिवाद करतानाचे पाहायला मिळत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये निक्की वैभवला असं म्हणते की, तुझ्याहूम गद्दार या घरात कुणी नाही” यावर वैभव असं म्हणतो की, “तुझ्यासाठी मी इथे गद्दारच आहे. आता मी तुझ्याबरोबर अशी गद्दारी करणार की तू बघत बसशील.” पुढे निक्की असं म्हणते की, तुझं डोकं डोकं नाही तर खोकं आहे”. यावर वैभवही तिला “तुझं खोकं आता फोडेन ना” यापुढे निक्की वैभवला “बावळट, गप्प रहा” असं म्हणते”. बिग बॉसचा हा नवीन प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, या टास्कदरम्यान सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अनेकांनी गद्दारी केली, घरात स्वत:चं मत नाही, गेम खेळता येत नाही अशी कारणं देत विरोधी स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे. आता या थेट नॉमिनेशन प्रक्रियेत कोण-कोणाला नॉमिनेट करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणारं हे नॉमिनेशन कार्य पाहून नेटकऱ्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.