Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या ५ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार निवडण्यासाठी बसमध्ये बसण्याचा टास्क खेळवण्यात आला. त्यानंतर वर्षा उसगांवकर, अंकिता प्रभू वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण या कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी पात्र ठरतात. अशातच आज सकाळी ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमुळे घराचा नवा कॅप्टन ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण झाल्याचे समोर आले. गुरुवारी पार पडलेल्या या टास्कमध्ये सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर हे चार सदस्य शेवटपर्यंत बसमध्ये टिकून राहिले. त्यामुळे हे चार जण कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले होते आणि यातून सूरज हा घरचा नवीन कॅप्टन झाल्याचे समोर आले. (Bigg Boss Marathi 5 Janhavi Killekar angry
कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’ गेम करत बाजी मारली आणि तो आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही दिसत आहे. सूरजच्या या कॅप्टन्सीचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यामुळे घरातील सदस्य “हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो”, अशा घोषणा देताना दिसत आहे. तसंच त्याचं अभिनंदन करत असल्याचेदेखील या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. मात्र त्याच्या या कॅप्टन्सीवर घरातील एक स्पर्धक नाराज आहे आणि ही स्पर्धक म्हणजे जान्हवी किल्लेकर.
‘बिग बॉस मराठी’चा नवीन कॅप्टन सूरज झाल्याचे जान्हवीला पटलेले नाही आणि यामुळे तिने सूरजबद्दल राग व्यक्त केला आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे नुकताच एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यातून तिच्या सूरजच्या कॅप्टन्सीबद्दलचा राग दिसून येत आहे आणि याबद्दल तिने थेट बिग बॉसलाच जाब विचारला आहे. या प्रोमोमध्ये ती बिग बॉसला जाब विचारत असं म्हणते की, “हा (सूरज) आता कॅप्टन्सीसाठी पात्र का आहे हे तुम्ही मला सांगा. तुम्हाला मनापासून वाटतं का? की मी कॅप्टन होण्याच्या लायकीची नाहीये. जे लोक सुधरण्याचा प्रयत्न करत आहेत ना त्यांना म्हणताय की तुम्ही सुधरलात तरी काही फायदा नाहीये. आम्ही तुमच्याशी तसंच वागणार. दुसरी अपेक्षाच काय करु शकते मी”.
दरम्यान, जान्हवीचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिला सूरजच्या कॅप्टन्सीबद्दल असूया वाटत असल्याचे म्हटलं आहे. या नवीन प्रोमोखाली नेटकऱ्यांनी “किती माज आहे हिला सुरज कँप्टन झालेल हिला पहावत नाही”, “शेपूट वाकडच राहणार”, “अरे यार आम्हाला वाटल ही सुधारली पण हिची ही नाटक आहेत”, “चार दिवस दिवस नीट वागणे आणि कायम नीट वागण्यात खूप फरक असतो” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.